हॅलो महाराष्ट ऑनलाईन । भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हिटमॅन रोहित शर्मा नंतर आता किंग विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्त (Virat Kohli Test Retirement) होण्याचा विचार करतोय. विराट कोहलीने याबाबत BCCI ला आपला निर्णय कळवला आहे, परंतु विराटने पुन्हा एकदा विचार करावा आणि आपला निर्णय बदलावा अशी विनंती BCCI ने त्याला केली असल्याचं बोललं जातंय. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. खरं तर मागच्या आठवड्यातच रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यातच आता विराट सुद्धा निवृत्त झाल्यास भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतरच कोहली त्याच्या कसोटी भविष्याचा विचार करत होता, त्यानंतर अखेर त्यानं त्याच्या मनाची तयारी केली आहे. आपण कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होतोय असं विराटने बीसीसीआयला कळवलं आहे. परंतु आगामी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका महत्वाची असल्याने विराटने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती बीसीसीआयने विराटला केली आहे. मात्र त्यानंतर त्याने अजूनही फेरविचाराबाबत काहीही सांगितलेलं नाही, त्यामुळे विराटची कसोटी क्रिकेट मधील निवृत्ती जवळपास नक्की झालीय. . पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ निवडण्यासाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची काही दिवसांत बैठक पार पडणार आहे, त्याच्या आधीच विराटने निवृत्त होण्याचा विचार केलाय. (Virat Kohli Test Retirement)
विराट निवृत्त झाल्यास, भारताचा अननुभवी संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल, कारण कर्णधार रोहित शर्माने सुद्धा मागच्या आठवड्यातच कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट आणि रोहित मागच्या १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेटच प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे दोघांचेही एकाच वेळी निवृत्त होणे भारतीय क्रिकेटला नक्कीच परवडणारे नसेल.
कशी आहे विराटची कसोटी कारकीर्द – Virat Kohli Test Retirement
दरम्यान, ३६ वर्षीय कोहलीने भारतासाठी १२३ कसोटी खेळल्या आहेत. त्यात त्याने ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये व विराटने ३० शकते आणि ५० अर्धशतके झळकावली आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा त्याने बरीच वर्ष केले. मात्र गेल्या पाच वर्षांत त्याची कसोटी सरासरी चांगलीच घसरली. मागील ५ वर्षातील ३७ कसोटी सामन्यांमध्ये ३ शतकांसह त्याच्या बॅट मधून अवघ्या १,९९० धावा निघाल्या. ऑस्ट्रेलियाच्या अलिकडच्या दौऱ्यात, त्याने ५ कसोटी सामन्यांमध्ये सरासरी २३.७५ धावा केल्या. धक्कादायक बाब म्हणजे ८ पैकी ७ वेळा तो ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर बाद झाला होता.




