हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) लोकसभेच्या निवडणुकीसाठी 21-10-17 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर करण्यात आला आहे. यात सांगलीच्या जागेवर शिवसेनेने (Shivsena) शिक्कामोर्तब केला आहे. तर भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार विशाल पाटील हे नाराज झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ते नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. कारण, सांगली मतदारसंघातून विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवतील हे जाहीर करण्यात आले होते. परंतु ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे विशाल पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
सध्या सांगलीची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला गेल्यामुळे काँग्रेसमध्ये शांतता पसरली आहे. आता महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस नेत्यांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होते. तसेच या लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या पाच वर्षांपासून विशाल पाटील पूर्ण तयारी करत होते. त्यामुळे सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळेल आणि काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे याचा काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून सांगलीच्या जागेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांनी बंडखोरीत करण्याची तयारी दाखवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर “ही जागा खरंतर काँग्रेसलाच मिळायला पाहिजे होती. पण राज्यातील नेते आणि देशातील नेत्याकडं वारंवार मागणी करत होतो. पण आजची परिस्थिती झाली ते दुर्देवी आहे” अशी प्रतिक्रिया आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे.