सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे या मार्गावर चोवीस तासात 25 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा रस्ता एका दिवसात तयार करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. रविवारी दि. 30 मे रोजी सकाळी 7 वाजता 25 किलोमीटपेक्षा अधिकचा रस्ता तयार करण्यास सुरूवात केली आहे. सदरचा विश्वविक्रम हा 25. 54 किलोमीटरचा आहे.
पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे साडेतीन मीटर रुंद आणि 47 किलोमीटर लांबीचा असा हा रस्ता आहे. जवळपास 474 कामगार आणि 250 वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्याचे सुरू आहे. कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता मुंगळीवार, सदा साळुंके, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्यांच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
जगदीश कदम म्हणाले, “पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला पुसेगाव ते म्हासुर्णे या 47 किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते. यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी, या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना पुढे आली. राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात 25 किलोमीटरपेक्षा अधिकचा डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला.”
विश्वविक्रमासाठी सूक्ष्म नियोजन
या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. 30 किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते. या कामासाठी एकूण 11 हजार मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सही पेव्हर, 12 टँडम रोलर व 6 पीटीआर वापरण्यात आले. या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण 180 हायवा टिप्पर गाडी वापरण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि 71 कर्मचारी असे एकूण 79 कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून 474 कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते. यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.