सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
विटा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत खानापूर तालुक्यातील चिखलहोळ, रेणावी आणि वाळूज येथील तीन घरफोड्या उघडकीस आणून आंतरराज्य अट्टल चोरट्यांच्या धूम टोळीचा छडा लावला. या टोळीतील एका अट्टल चोरट्यास गजाआड केले असून योगेश रमेश नानावत असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. तर त्याचे अन्य तीन साथीदार फरार आहेत.
उघडकीस आणलेल्या घरफोड्यांमधून 228 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 हजार 40 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व दोन मोटरसायकल असा सुमारे 13 लाख 80 हजार 640 रूपयांचा मुद्देमाल त्या चोरट्याकडून हस्तगत केला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम आणि विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन महिन्यांपासून चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत खानापूर तालक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घातला होता.
घरफोडींच्या वाढत्या घटनांमुळे खानापूर तालुका परिसरात चोरट्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या चोरट्यांना जेरबंद करण्याचे विटा पोलिसांपुढे आव्हान होते. त्यामुळे विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह तपास पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने धडाकेबाज कारवाई करत या चोरट्यांच्या धूम टोळीचा माग काढत टोळीचा पर्दाफाश केला आहे.