अंबाजोगाई | मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. याचा परिणाम म्हणून बीड जिल्ह्यातही जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रोजगाराच्या अभावातून या भागातील रोजंदारीवर काम करणारे कष्टकरी, विधवा महिला आणि रोज कसेबसे जेमतेम पोट भरणारे कित्येक गरीब कुटुंबं एक वेळ काहीतरी खाऊन दिवस काढत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन पुण्यातील ‘वोवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन’ (वोपा) ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने अशा ५० गरजू कुटुंबांना प्रत्येकी 10 दिवसांसाठीच्या अन्नधान्याची मदत केली आहे. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, मसूर डाळ, बेसनपीठ, साखर, मीठ अशा जीवनावश्यक अन्न पदार्थांची पाकिटे या गरजू कुटुंबांना देण्यात आली आहेत.
वंचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करताना वोपा संस्थेचे प्रमुख प्रफुल्ल शशिकांत म्हणाले, ‘मागील 2 वर्षांपासून आम्ही या भागातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काही प्रयत्न करतो आहोत. ते काम सुरु असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनने हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांची अडचण केली आहे. अशावेळी पोटभरे सरांनी केलेल्या आवाहनाला आम्हाला प्रतिसाद देता आला याचा आनंद वाटतो. पुढे देखील गरजेनुसार आणखी काही कुटुंबांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’
वोपा ही संस्था मागील 2 वर्षांपासून मराठवाड्यातील ग्रामीण शाळांचा विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षण या क्षेत्रात कार्यरत आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार मराठवाड्याचा शैक्षणिक विकास इतर भागाच्या तुलनेत बराच कमी आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन वोपा संस्था जिल्ह्यातील शिक्षणात सुधारणा करण्यासाठी बीड भागात काम करत आहे. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यावर आलेल्या संकटाची ही स्थिती ओळखून वोपाने वंचितांच्या पोटाचा प्रश्न सोडवण्याला पुढाकार दिला. त्याचाच भाग म्हणून या संस्थेने आपल्या मुख्य शैक्षणिक कामाला बाजूला ठेऊन गरजू कुटुंबांना सहाय्य केलं. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्याच्या या उपक्रमात जेष्ठ समाजसेवक कॉम्रेड बब्रुवाहन पोटभरे, निवृत्त अधिकारी श्री. चंद्रकांत वडमारे यांच्यासह रोहित खिंडरे, डॉ. चामनार आणि विशाल पोटभरे हे देखील सहभागी होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग
कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क
शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार