हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मतदान करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे निवडणूक ओळखपत्र. यालाच आपण मतदान कार्ड म्हणून देखील संबोधतो. मतदान कार्ड काढले नसल्यास आपल्याला मतदान करता येत नाही. यासह मतदानाच्या यादीमध्ये नाव नसल्यासही मतदान करण्याचा अधिकार बजावता येत नाही. म्हणजेच निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते मतदान कार्ड. परंतु याच मतदान कार्डमुळे एखाद्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. (Voter Awareness)
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीकडे एक पेक्षा अधिक मतदान कार्ड असणे कायदेशीर गुन्हा आहे. असे असल्यास त्या व्यक्तीला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीकडे एक पेक्षा अधिक मतदान कार्ड असेल तर ते सरेंडर करावे लागते. यासाठी त्या व्यक्तीला ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ऑफलाइन प्रक्रियेत, एखाद्या व्यक्तीकडे दोन मतदान कार्ड असतील तर त्याने तहसीलदार ऑफिसमध्ये निवडणूक विभागात जाऊन अर्ज करून दुसरे मतदान कार्ड रद्द करावे.
याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने मतदान कार्ड रद्द करायचे असल्यास, ईसीआयच्या वेबसाईटवर जावे. यानंतर मोबाईल क्रमांक नोंदवून नको असलेले मतदान कार्ड रजिस्टर करून ते रद्द करण्याची विनंती करावी. (Voter Awareness) यासाठी फॉर्म सात भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर मतदान कार्ड रद्द झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी स्टेटस ट्रॅक करावे. यावरून समजून जाईल की तुमचे मतदान कार्ड रद्द झाले आहे की नाही.