कर्नाटक। कर्नाटक विधानसभेत सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या १५ आमदारांच्या मतदार संघात आज पोट निवडणूक पार पडत आहे. या 15 जागांसाठी 165 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी या १५ जागांपैकी ८ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे हि निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
जर या पोट निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या तर कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकतं. आणि पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. त्यामुळे भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.
दरम्यान सुरवातीला जेडीएसच्या १२ आमदारांनी बंडखोरी केली आणि हा एकदा वाढतच गेला. परिणामी कुमारस्वामी सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी जुलै 2019 मध्ये मोठा निर्णय घेत काँग्रेस- जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. त्याआधी तिघांना निलंबित करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी 17 जणांना अपात्र ठरवत निवडणूक लढण्यास मज्जाव केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात निकाल देताना या 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवताना त्यांना दिलासा दिला होता. हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकतील असं नमूद केलं होतं.
गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर, यल्लापूर या मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.