दहिवडी | फलटण रस्त्यावर असलेल्या वडगाव ते दहिवडी मार्गावर काही ठिकाणी रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झालेली आहे. तसेच या मार्गात मोठ- मोठे खड्डे असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला गेला आहे. त्यामुळे या मार्गात लोकांना प्रवास करणे खुपच अवघड होऊन बसले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठीकठिकाणी खोळंबलेल्या चौपदरीकरणातील कामे त्या- त्या गावांमधील नागरिक आणि प्रशासनानी योग्य तो मध्यम मार्ग काढणे गरजेचे आहे. रस्त्यात जर खड्डे पाण्याने भरलेले असून त्यांना तळ्याचे रूपडे आलेले पहायला मिळत आहे. तेव्हा लोकांनी अजून किती दिवस हा रोजचा संघर्ष करीत राहायचे असा सवाल केला जात आहे.
उद्योग धंद्यासाठी या मार्गावरून लोकांना ये- जा करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. दहिवडी ही मोठी बाजार पेठ असल्याने तसेच आठवड्यातुन भरणाऱ्या सोमवारच्या बाजारातून घरातील भाजी पाल्यांपासून ते जनावरांच्या खरेदी विक्रीपर्यंतचे सगळे व्यवहार इथे होत असतात. काही लोकं रस्त्यातील खडड्यांचा त्रास नको म्हणून बिदाल मार्गाने दहिवडी तर वावरहिरे मार्गाने जास्त पैसे करुन जात असतात. परंतु काहींसाठी रस्ता कसा ही असो पण लोक खड्डे चुकवीत ये- जा करीत असतात.
बांधकाम प्रशासानाचा दहिवडी-फलटण रोडवरील मोगराळे घाट ते बिजवडी दरम्यान चे खड्डे बुजवण्याचे काम गेले काही दिवसांपासून चालू आहे. परंतु अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. पुढचे पाठ मागचे सपाट या पद्धतीने काम चालु आहे. योग्य प्रमाणात डांबर वापरत नसल्यामुळे लगेचच पुन्हा गाड्या गेल्यावर काही काळातच तो खड्डा जैसे थे होत आहे. यावर प्रशासनाबरोबच सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष देखील करत आहेत.
निकृष्ट दर्जाच्या कामाची चाैकशी करावी : शरद दडस
माणचे आमदार फक्त निवडणुकीच्यावेळी आश्वासन देण्यात हुशार आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. प्रवाशांना खड्डातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाची सर्व चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी शरद दडस यांनी केली आहे.