Saturday, March 25, 2023

प्रा. शिंदे खून प्रकरण- विहिरीतील पाणी उपसण्यात गेला सातवा दिवस !

- Advertisement -

औरंगाबाद – शहरातील सिडकोतील प्रा.राजन शिंदे खून प्रकरणाचा छडा सातव्या दिवशीही पोलिसांना लागला नाही. काही क्लू न मिळाल्याचेही चित्र स्पष्ट होताच प्रा. शिंदे यांच्या मारेकऱ्याने घराजवळच्याच विहिरीत खून केलेली हत्यारे टाकल्याचा पोलिसांना ‘क्लू’ मिळाला. त्यानंतर महापालिकेला पत्र देऊन खुनाच्या पाच दिवसांनंतर विहिरीतील पाणी उपसण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी या खून प्रकरणातील आणखी चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांना प्रा. शिंदे खुनप्रकरणात क्लू मिळाला नसल्याच्या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. मुळात प्रा. शिंदे यांच्या मुलाने पोलिसांना आतापर्यंत दिलेल्या माहितीमध्ये प्लॅन्ड उत्तरे दिल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. दरदिवशीच्या चौकशी दरम्यान मुलाकडून ‘वेल प्लॅन्ड’ उत्तरमिळत असल्याने पोलिसही हतबल झाले होते. मात्र रविवारी (ता.१७) यामध्ये काहीसा क्लू मिळाल्याचे माहिती पोलिस दलातील सुत्राने दिली आहे. आतापर्यंत प्रा. शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी खुनाचे चक्क प्रात्यक्षिक करुन दाखविल्याची चर्चा समाजमाध्यमांसह नागरिकांत रंगली होती, मात्र पोलिस दलातील सुत्रांनी या माहितीस दुजोरा दिला नाही, मात्र सोमवारी (ता.१८) दुपारपर्यंतच खुनासंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होईल अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे खुनाच्या पाच दिवसांनंतर विहिरीतील पाणी उपसा करण्यास सुरुवात केली असली तरी हत्‍यारे मिळविण्यासाठी पोलिसांनी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. नेमकाच यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रविवारी (ता.१७) चार मोटारीलाही विहिरीतील पाणी हटत नव्हते. शनिवारपासून या विहिरीतील पाणी काढणे सुरू आहे. शनिवारी विहिरीतील पाणी उपसण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी साडेसात एचपी, पाच एचपी अशा चार मोटारी लावण्यात आल्या होत्या. तर दुपारनंतर पुन्हा दोन मोटारी वाढवून पाणी उपसणे सुरूच होते. ही विहीर जुनी असल्याने तसेच तिचा वापर नसल्याने विहिरीत मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे, त्यामुळे पाणी उपसण्यासही अडचणी येत होत्या.