सातारा | त्रिशंकू भागातील समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे शाहूनगर आणि विलासपूर भागाचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. शाहूनगर आणि विलासपूरसाठी स्वतंत्र, विस्तारित आणि परिपूर्ण पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून तब्ब्ल 32 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई येथे सोमवारी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ व इतर संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली. शाहूनगर आणि विलासपूरसाठीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंबंधाने सविस्तर चर्चा करून अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला. शाहूनगर, विलासपूर या भागात गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसंख्या वाढीमुळे आणि जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्यामुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन विस्तारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली पाहिजे, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता.
या योजनेसाठी नगरोत्थानमधून 32 कोटी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून या निधीतून कृष्णा नदीवर नवीन जॅकवेल, इंटेक वेल, दाब नलीका, गुरुत्व नलिका, विसावा नाका येथे अद्ययावत जलशुद्धीकरण केंद्र, शाहूनगर, विलासपूर येथे चार नवीन पाणी साठवण टाक्या उभारण्यात येणार आहेत. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे शाहूनगर आणि विलासपूर भागात सुमारे 60 किलोमीटर परिसरात पूर्णपणे नवीन जलवाहिन्या टाकून स्वतंत्र आणि नवीन पाणी वितरण व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे शाहूनगर आणि विलासपूर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार असून या भागातील नागरिकांनाचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेची हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला विकासाच्या प्रवाहात आणले. आता नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावल्याने त्त्रिशंकू भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.