औरंगाबाद | मागील १२ वर्षापासून चिकलठाणा विमानतळाला भेडसावत असलेला पाणी प्रश्न अखेर संपूष्टात आला आहे. एमआयडीसीने चिकलठाणा विमानतळाला पाणी दिले असून गुरूवारी (दि.10) विमानतळावर जलपुजन सोहळा रंगला होता. तब्बल बारा वर्षानंतर पाणीप्रश्न सुटल्याने चिकलठाणा विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे यांनी याप्रसंगी एमआयडीसीचे आभार व्यक्त केले.
चिकलठाणा विमानतळावर झालेल्या जलपुजन सोहळ्यास विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे, सहायक प्रबंधक सुधीर जगदाळे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, एमआयडीसीचे निवृत्त उपअभियंता दिलीप परळीकर, उपअभियंता गणेश मोईकर, सहायक अभियंता प्रशांत सरग, व्ही. ए. बनसोडे, शारदा इन्फोटेकचे निखिल कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या बारा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. विमानतळ प्राधिकरणाने महानगरपालिकेकडे चार इंच जलवाहिनी जोडण्याची मागणी केली होती. 1 लाख 70 हजार लिटर पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणने 2007 पासून 2019 पर्यंत मनपाकडे पाठपुरावा केला. परंतु, मनपाकडून विमानतळाला पाणी मिळाले नाही. त्यानंतर विमानतळ निर्देशक डी. जी. साळवे यांनी 12 जून 2021 मध्ये एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे चार इंच व्यासाची पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविला होता.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी 15 जूलै 2019 मध्ये या योजनेच्या कार्यान्वयासाठी लागणाऱ्या सर्व अटी, नियम, डीपॉजीट वर्क दोन्ही विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या परवानग्या व 236.56 लाख रूपयांचे अंदाजपत्रक दिला होता. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने या प्रस्तावास अनुमोदन करून सदरच्या सहमती करार 9 ऑक्टोबर 2020 मध्ये संमत केला होता. दरम्यान, गुरूवारी चिकलठाणा विमानतळावर जलपूजन सोहळा मोठा उत्साहात पार पडला. या कामासाठी विशेष परीश्रम घेतलेले सहायक अभियंता प्रशांत सरग, बनसोडे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.