औरंगाबाद – तांत्रिक अडचणींमुळे शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना तब्बल सात-आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. त्यात आता पाटबंधारे विभागाच्या नोटिशीमुळे शहराचा पाणी पुरवठा संकटात सापडला आहे. पाणी बिलाचे 26 कोटी 32 लाख रुपये 18 फेब्रुवारीपर्यंत भरावेत, अन्यथा सोमवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
महापालिका पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी घेण्यासाठी पाटबंधारे विभागाला पैसे मोजते. पण पाण्याचे बिल थकल्यामुळे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभाग मार्च एन्डला महापालिकेला नोटीस बजावून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देते. काही रक्कम भरताच विषय लांबणीवर पडतो. यंदा पुन्हा एकदा महापालिकेकडील पाणी बिलाची थकबाकी २६ कोटी ३२ लाख रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला नोटीस पाठवून 18 फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा करण्याची सूचना केली आहे. अन्यथा सोमवारपासून पाणी उपसा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान बिलाची फाईल प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे असून, दंड, व्याज या रकमा वळत्या करून पाण्याचे बिल भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अशी असेल कारवाई –
21 फेब्रुवारीला पाणी उपसा दोन तासांसाठी बंद केला जाईल. त्यानंतर 22 फेब्रुवारीला चार तासांकरिता, 23 फेब्रुवारीला सहा तासांकरिता २४ फेब्रुवारीला आठ तासांकरिता तर 25 फेब्रुवारीला पाणी उपसा पूर्णपणे बंद केला जाईल असे पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे.