कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
स्थानिकांना मासिक पास काढण्याचा नवीन नियम टोलनाका प्रशानाने काढला आहे. 15 वर्षे येथील टोलनाका आमच्या उरावर आहे. या अगोदर आम्ही कधी टोल दिला नाही, पास काढला नाही अन् काढणार नाही. आमचे आरसी बुक पाहून आम्हांला टोलनाक्यावरून स्थानिक म्हणून टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव यांनी केली आहे.
पुणे- बंगळूर महामार्गाव कराड शहराजवळ असलेल्या नाक्यावर आज परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमलेले होते. स्थानिकांचा टोल घेऊ नये यासाठी उंब्रज व परिसरातील नागरिकांनी टोल नाका व्यवस्थापनाला सोमवारी दुपारी निवेदन दिले. आम्ही टोल देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव तसेच सरपंच योगराज जाधव, विजय जाधव, राजशेठ जाधव व अन्य वाहनधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उंब्रज विभागातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमनाथ जाधव म्हणाले, आज टोलनाका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनाचा विचार करून सूट न दिल्यास तीव्र आंदोलनाचा तासवडे टोलनाक्यावर स्थानिकांना सोबत घेवून आंदोलन केले जाईल. सध्या वरिष्ठांना सदरचे निवेदन दिले जाईल, असे तासवडे टोलनाका प्रशासनाने सांगितले आहे.