औरंगाबाद : बीड येथे झालेल्या आरक्षण जनसंवाद कार्यक्रमात खासदार संभाजीराजे भोसले यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना म्हणाले होते “मला मुख्यमंत्री करा, मगच प्रश्न विचारा”. संभाजीराजेंच्या या वक्तव्याला, ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून संभाजी ब्रिगेडमध्ये सहभागी व्हावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असे संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिले आहे.
बीडच्या मराठा जनसंवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना खा. भोसले यांनी ‘मला मुख्यमंत्री करा आणि मग प्रश्न विचारा’, असे म्हणाले होते. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले, मला त्यांना सांगायचंय, की तुम्ही पहिल्यांदा भाजप सोडा आणि संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असे प्रत्युत्तर भानुसे यांनी खा. भोसले यांना दिलं आहे.
बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला होता. खासदार संभाजीराजे संतप्त झाले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना ‘मला मुख्यमंत्री करा, मग प्रश्न विचारा’ असे म्हणाले होते.