कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
गेल्या अनेक वर्षांपासून कराड तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी (महावितरण) यांना तुटपुंज्या वेतनावर महावितरण कंपनीमध्ये काम करावे लागत आहे. दरम्यान महावितरणकडून अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले जात आहे. या प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी कराड येथील वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बुंदीले यांना सूचना दिल्या. सात दिवसात वीज कंत्राटी कामगारांची बदली न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असे निवेदन यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले.
प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज कराड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. त्यानंतर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधत सात दिवसात कंत्राटी कामगारांची बदली थांबवावी, अशा सूचना केल्या.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंत्राटी कर्मचारी यांना अल्प मानधन पाहता बदलीच्या ठिकाणी जाऊन नोकरी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे महावितरणने कंत्राटी कामगारांचा सहानुभूती पूर्वक विचार करून सरसकट बदली रद्दची कारवाई थांबवावी. येत्या ७ दिवसात वीज कंत्राटी कामगारांची बदली न थांबवल्यास आपल्या दालनामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव मनोज माळी, शिवाजी चव्हाण, बंटी भाऊ मोरे, आशिष जाधव, कंत्राटी कर्मचारी अमर पवार, वैभव चव्हाण, जितेंद्र परांजपे, कृष्णत पवार आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.