गलवान खोऱ्यातील शहिदांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; वायुसेना प्रमुखांनी दिला शब्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । भारतीय सैन्य आणि हवाई दल चीनसोबतच्या तणावापासूनच हाय अलर्टवर आहे. अशा वेळी हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया यांनीही (India air force chief) आता चीनला इशारा दिला आहे. उंच रणभूमीवर प्रत्येक आव्हानासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे आणि अगदी शॉर्ट नोटीसवरही आम्ही आव्हानाला तोंड देऊ, असं हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया (rks bhadauria) म्हणाले. हैदराबादमध्ये भारतीय वायू सेना अकादमीच्या पासिंग आऊट परेडला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गलवान खोऱ्यातील शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचा शब्द त्यांनी दिला.

संबोधनाच्या सुरुवातीलाच आरकेएस भदोरिया यांनी शहीद कर्णल संतोष बाबू आणि त्यांच्या टीमच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. एका उंच रणभूमीवर अनेक आव्हाने असताना त्यांनी शौर्य दाखवून दिलं आणि देशाच्या अखंडतेची रक्षा केली. विविध करार असतानाही चीनकडून एलएसीवर करण्यात आलेल्या कारवाईनंतरही आपण शांततापूर्ण मार्गाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत, असं हवाई दल प्रमुख भदोरिया म्हणाले.

”मी पूर्ण देशाला आश्वस्त करतो की कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य सज्ज आहे आणि आपल्या जवानांचं बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी देशाला दिलं. लडाखमधील स्थिती पाहता आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत,” असं हवाई दल प्रमुख भदोरिया यांनी स्पष्ट केलं. ”आपण ज्या परिस्थितीत देशासोबत राहतो, त्याची मूळ गरज हीच असते की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सज्ज असावं. याच तयारीची छोटीशी झलक नुकतीच लडाखमध्ये पाहिली गेली, ज्यातून हे दिसतं की कशा प्रकारे कोणत्याही शॉर्ट नोटीसवर लढण्यासाठी वायू दल सक्षम आहे,” असं हवाई दल प्रमुख भदोरिया म्हणाले.

दरम्यान, नुकतंच भारतीय हवाई दल प्रमुख आरएसके भदोरिया यांनी लेह आणि श्रीनगर येथील हवाई तळांना भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल हाय अलर्टवर आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यासोबतच्या सुरक्षा बैठकीनंतर भदोरिया यांनी लेह आणि श्रीनगर दौरा केला. त्यानंतर हवाई दलाचे शक्तीशाली लढाऊ विमाने लडाख आणि परिसरात तैनात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”