औरंगाबाद – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरून शिवसेना-एमआयएममध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्याचा अनुशेष भरून काढल्याबद्दल मुक्तीसंग्रामदिनी तुतारी वाजवून उपरोधक स्वागत केले जाईल, असे जाहीर केले आहे. त्याला शिवसेनेकडून चोख उत्तर दिले असून, शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी तुम्ही गुटखा हद्दपार केला, दारूचे अड्डेही बंद केले. या कामगिरीमुळे पद्म पुरस्कारासाठी तुमची शिफारस करू, अशी उपहासात्मक टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त विमानतळ ते सिद्धार्थ उद्यानातील सभामंडपापर्यंत एमआयएमकडून ठिकठिकाणी तुतारी वाजवून, पुष्पवृष्टी करून बॅनरद्वारे स्वागत केले जाईल, असे इम्तियाज जलील यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यावर शिवसेनेने पलटवार केला आहे. यासंदर्भात राजू वैद्य यांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, सन ‘‘२०१५ पासून आपण मराठवाडा मुक्तिसंग्राम सोहळ्याला उपस्थित राहिलात. स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत आलात हे खरेच अभिनंदनीयच नाही तर गौरवपूर्ण बाब आहे. यासाठी आपल्याला पद्म पुरस्कार द्यावा, अशी विनंती आम्ही करणार आहोत. तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीचा ताबा घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या भूमाफियायांना ज्या पद्धतीने जेरबंद करत करिष्मा दाखवला, त्याची दखल घेतलीच पाहिजे. गुटख्याविरोधात मोहीम उघडली. मध्यंतरी अवैध दारूचे अड्डे देखील आपण बंद करून मोठे समाजकार्य केले आहे. या कामाची दखल घ्यावी तेवढी कमीच आहे.
तसेच आपला मतदारसंघ आज आदर्श मतदारसंघ म्हणून नावारूपाला आलाय. खासदार म्हणून अल्पावधीत आपण संपूर्ण मतदारसंघ विकास कामांनी गजबजून टाकलाय. महापालिका सभागृहात तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांनी शालीनता आणि संस्कारांचे यथोचित प्रदर्शन घडवत इतिहास घडवला, याचा अभिमान शहरवासीयांना आहे, असे वैद्य यांनी पत्रात नमूद केले आहे.