हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यभरात हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची चिन्हं दिसत असून, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर अन उपनगरांमध्ये मागील 24 तासांत अंशतः ढगाळ वातावरण राहिले आहे , तर मराठवाडा आणि विदर्भात तापमानात कमालीची वाढ नोंदवली गेली. तर अकोला अन मालेगावमध्ये पारा चक्क 43 ते 44 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिकांना उकाड्याने त्रस्त केले आहे . हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
पाऊस आणि गारपिटीचा इशारा (Weather Update) –
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव अन लातूर या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणेकरांना आता थोडासा दिलासा –
सलग तीन दिवस उन्हाच्या तडाख्यानं (Weather Update) त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता थोडासा दिलासा मिळाला. पुण्यात तापमानात किंचित घट झाली असली, तरी ही स्थिती तात्पुरतीच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील तीन दिवस तापमान पुन्हा वाढणार असून, वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढल्याने उकाडाही जाणवणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.