हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यभरात उन्हाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. विदर्भ, मराठवाडा अन उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा थेट चाळीशी पार करत आहे, तर काही ठिकाणी 42 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागलं आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे अनेकांचे नुकसान होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसही दिलासादायक हवामान मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. येत्या 24 तासांसाठी मध्य महाराष्ट्र अन मराठवाडा या भागांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उष्णतेची तीव्रता अधिक (Weather Update) –
राज्यात सध्या वाढलेली उष्णता आणि दमट हवामान यामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत. विशेषतः मराठवाडा व मध्य महाराष्ट्र भागात दमट वाऱ्यांमुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. मुंबई आणि कोकणातही आर्द्रतेचा पारा चढल्यामुळे उष्म्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. मुंबईत तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान असले तरी आर्द्रतेमुळे उष्ण हवामान अधिक जाणवत आहे.
राज्यभरात वातावरणात बदल –
हिमालयामध्ये (Weather Update) नव्याने सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावातामुळे आणि राजस्थानच्या वायव्य भागात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यभरात वातावरणात बदल होत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र ते कर्नाटक, केरळ अन तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, लवकरच पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी सध्या मुसळधार पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
नागरिकांसाठी उपाय –
शक्य असल्यास दुपारी 12 ते 3 वाजेच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
पाणी, लिंबूपाणी, ताक, फळांचे रस यांचा पुरेशा प्रमाणात वापर करावा.
हलके, सैलसर आणि सूती कपडे घालावेत.
उष्माघाताची लक्षणं (डोकेदुखी, चक्कर, मळमळ) दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.