Weather Update: राज्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ; ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट जारी

Weather Update (7)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रविवारपासून पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक, तर जगात चौथ्या क्रमांकाचे तापमान नोंदवले गेले. चंद्रपूरमध्ये 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून शहरातील दुपारच्या वेळेस शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ (Weather Update)

विदर्भातील अकोला (44.3 °C), अमरावती (44.4°C), नागपूर (44.0°C), वर्धा (44.0°C) या शहरांमध्येही तापमानाने 44 अंशाचा टप्पा ओलांडला आहे. या भागात उष्णतेमुळे पाण्याची कमतरता आणि आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत आहे. चंद्रपूरमध्ये रात्रीचे तापमानही उच्च असल्याने नागरिकांना रात्रीसुद्धा आराम मिळताना दिसत नाही. तसेच बीड, लातूर, धाराशिवसह मराठवाड्यातील जिल्ह्यांत उन्हाच्या झळांमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या शहरांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सकाळी अन संध्याकाळीच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत उकाडा –

कोकण किनारपट्टीवर तुलनेत कमी तापमान (Weather Update) असले तरी, मुंबईत रविवारी तापमान 33.6 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. ही पातळी मागील काही दिवसांच्या तुलनेत अधिक असून मुंबई आणि उपनगरांमध्ये उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याने नागरिकांना शक्यतो दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी पिणे, थंड पेये घेणे अन आवश्यक असल्यासच घराबाहेर पडणे हे उपाय सुचवले आहेत.