हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताना दिसत आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाचा कहर जाणवू लागला असून, विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर हे शहर सोमवारच्या (२१ एप्रिल) 45.6 अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. रविवारीही चंद्रपूर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले होते. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
यलो अलर्ट जारी (Weather Update) –
आजही विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर अन चंद्रपूर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागांतील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण असले तरी उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादी –
जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत भारताने वर्चस्व गाजवलं असून, पहिल्या 15 शहरांपैकी 11 शहरे भारतातील आहेत. त्यात विदर्भातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अमरावती व अकोलाचा समावेश आहे.
चंद्रपूर – 45.6°C (जगातील सर्वात उष्ण)
ब्रम्हपुरी – 45°C (जगात तिसरे)
अमरावती – 44.6°C (पाचवे)
अकोला – 44.1°C (बारावे)
इतर उष्ण शहरे –
झारसुगुडा (45.4°C), सिधी (44.6°C), राजनांदगाव (44.5°C), प्रयागराज व धूपुर (44.3°C), खजुराहो (44.2°C), आदिलाबाद (43.8°C), रायपूर (43.7°C) (Weather Update)
योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला –
हवामान विभागाने जनतेला शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि उन्हात जाणे अनिवार्य असल्यास योग्य उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे.