हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – राज्यभरात उष्ण लहरींनी जोर धरला असून, चंद्रपूरचे तापमान 45.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. ब्रह्मपुरीतही पारा 45.2 अंशांवर नोंदवला गेला. परिणामी, हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हिमालय ते काश्मीरपर्यंत काही भागांमध्ये पावसाचे वातावरण असून, मध्य व दक्षिण भारतात मात्र उष्णतेची तीव्रता वाढली आहे. महाराष्ट्र मध्य भारताचा भाग असल्यामुळे या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम विदर्भात जाणवतोय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 44 ते 45 अंशांवर पोहोचले आहे.
तापमानात वाढ (Weather Update) –
चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमानात वाढ झाली. तापमानात 0.2 अंशांची वाढ नोंदवली गेली. ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, वर्धा, अमरावती अशा शहरांमध्येही तापमानाने 44 अंशांचा पल्ला ओलांडला आहे. पुणे शहरातील लोहगाव येथे सलग चार वेळा पारा 43.2 अंशांवर स्थिरावला होता.
राज्यात उन्हाचा चांगलाच तडाखा –
राज्यात उन्हाचा चांगलाच तडाखा (Weather Update) बसला असून चंद्रपूरने सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. त्यानंतर ब्रह्मपुरी (45.2), अकोला (44.8), अमरावती (44.4), नागपूर व वर्धा (44.2) अशा विदर्भातील भागांमध्ये प्रचंड उष्णता जाणवली. वाशिम (43.5), सोलापूर (43.4), पुणे-लोहगाव (43.2) या भागांमध्येही तापमान उच्च पातळीवर पोहोचले. जळगाव, मालेगाव (42.8), गोदिया (42.7), धाराशिव (42.5) आणि छ. संभाजीनगर (41.6) या ठिकाणी देखील उष्णतेची तीव्रता जाणवली. पुणे-शिवाजीनगर व अहिल्यानगरमध्ये तापमान 41.2 अंशांवर राहिले, तर नाशिक (40.5), सातारा (40.9), सांगली (40.8), बुलडाणा (40.4) या भागांतही उन्हाची तीव्रता जाणवली. कोल्हापूर (38.8) तुलनेत थोडे सौम्य राहिले. मात्र कोकणातील रत्नागिरी (34.9), महाबळेश्वर (34.1) आणि मुंबई (33.9) येथे उष्णता तुलनेत कमी होती. राज्यात सरासरी तापमान झपाट्याने वाढत असून उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
हवामान विभागाचा अंदाज –
हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण लहरी (Weather Update) अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे अन उन्हापासून संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.