शाब्बास : हाॅटेल मालकाने 7 लाखांचे सोन्याचे दागिने केले परत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बंगलोर महामार्गावर गोव्याहून मुंबईला निघालेल्या ग्राहकांची 14 तोळे सोने असलेली पिशवी उंब्रज जवळील एका हाॅटेलात विसरली होती. परंतु या हाॅटेल मालकाच्या प्रामाणिकपणामुळे 7 लाखांचे दागिने मूळ मालकांना परत मिळाले. आपलं गाव या हाॅटेलमधील ही घटना आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज येथील हॉटेल आपलं गाव या ठिकाणी सुमारे 7 लाख रुपयांची दागिने असणारी ग्राहकाची बॅग सापडली. हाॅटेलचे मालकांनी सदरची बॅग उंब्रज पोलीस ठाण्यात जमा केली. दि. 2 रोजी रात्री ही घटना घडली. हाॅटेलचे मालक विजयसिंह व्यंकटराव जाधव, दिलीपराव आत्माराम पाटील, बाळासाहेब राजाराम ढवळे व अर्जुन कोळी यांना सोन्याचे दागिने असणारी बॅग मिळून आली. त्यांनी हाॅटेलमधील इतर ग्राहकांकडे चौकशी केली परंतु कोणाचीच नसल्याने ती बॅग उंब्रज पोलीस ठाण्यात जमा केली.

उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, अंमलदार दीपक जाधव, सचिन देशमुख, कराड शहर पोलीस ठाण्यातील हवलदार राजेंद्र देशमुख, महिला पोलीस नाईक चव्हाण यांनी सदर दागिन्याच्या मालकाचा शोध घेऊन त्यांना ती बॅग परत केली. अशफान अयाज मुलाणी व त्यांची पत्नी शर्मिन अशफान मुलाणी (रा. चेंबूर) हे गोव्याहून मुंबईला जाताना उंब्रज येथील हॉटेल आपलं गाव येथे जेवणासाठी थांबले होते. जेवण झाल्यानंतर ते निघून गेले. मात्र त्यांच्याकडील 14 तोळे सोने असणारी बॅग हॉटेलमध्येच विसरले होते. हॉटेल आपलं गावचे मालक यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अजय गोरड व सर्व पोलिसांनी त्यांचे कौतुक केले आहे.