Western Railways : फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका!! 71.68 कोटी वसूल केले

Western Railways
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Western Railways । रेल्वेने प्रवास करत असताना तिकीट न काढणारे आणि फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. पैसे वाचवण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करतात. मात्र आता याच फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने दणका दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अशा प्रवाशांकडून तब्बल 71.68 कोटी रुपये वसूल केले आहेत. लोकल गाड्या आणि रेल्वे स्थानकांमधील सखोल तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान हि कारवाई करण्यात आली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या काळात तिकीट तपासणी मोहिमा– Western Railways

पश्चिम रेल्वेच्या (Western Railways) वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या काळात अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या, या तिकीट मोहिमेच्या माध्यमातून तब्बल ७१.६८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातून वसूल केलेल्या १८.४० कोटी रुपयांचाही समावेश आहे. खरं तर विना तिकीट प्रवासामुळे तिकीट काढणाऱ्या प्रवासांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे मेल/ एक्सप्रेस गाड्या तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमधील प्रवाशांची रेल्वे प्रशासनाला विनातिकीट प्रवाशांबाबत तक्रार केली होती. रेल्वे प्रसासनाने याची दखल घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या बाबत हि मोहीम हाती घेतली होती.

याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रकाशित केलेल्या प्रसिद्धी पत्रात सांगितले आहे कि ऑगस्ट २०२३ मध्ये १.८३ लाख विना तिकीट प्रवाशांकडून १०.४२ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, ज्यामध्ये बुक न केलेल्या सामानाच्या केसेसचा देखील समावेश आहे. तसेच, ऑगस्ट महिन्यात, पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात ५९,००० हून अधिक विनातिकीट प्रवासांकडून २.५८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ठाकूर पुढे म्हणाले, मुंबईतील एसी लोकल गाड्यांमध्ये विना तिकीट प्रवासांना रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांमुळे एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत जवळजवळ ३३,००० हजार विनातिकीट प्रवाशांना दंड करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून १०९.१७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १७४ टक्क्यांहून जास्त आहे.