औरंगाबाद – माझे दोन खासदार आहेत. घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे?, या शब्दांमध्ये एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. काल औरंगाबाद येथे एमआयएमची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण आदी उपस्थित होते.
तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. कायदा हातात घेण्याची गरज नाही. कोणाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची गरज नाही. आम्ही उत्तर देऊ. कोणताही कुत्रा भोकत असेल तर त्याला भोकू द्या. कुत्र्याचे काम भोकण्याचे आहे. सिंह शांततेत जातो. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. ते जाळ विणत आहे, असे आवाहन ओवैसी यांनी केले. तुम्ही शांत राहा. मी हसत चाललो आहे. त्यांना त्रास होत आहे. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद ! हा देश जितका त्यांचा आहे, तितकाच आपला आहे, असे ते म्हणाले. शाळेच्या कॅम्पस उभारणी मागे राजकारण नाही. जन्मभरात अकबरुद्दीन ओवैसी राजकारणी कधीच बनला नाही. मला आमदार, खासदार व्हायचे नाही. मी श्रीमंती, पैशामागे पळालेलो नाही. मी अल्लाला घाबरतो. चार वर्ष मी आमदार निधी घेतला नाही. पन्नास लाख जमा झाले. त्यातून शाळा सुरु केल्या, असे ते म्हणाले. आज औरंगाबादला आलो आहे, शाळा बनवण्यासाठी पाकिटात पैसे नाहीत. पण ही शाळा बनेल. मीडियावाले कॅमेरा उघडून म्हणतात की अकबरुद्दीन ओवैसी भडकावू भाषण देतात. मदरशाकडे या आणि तेथील परिस्थिती मीडियावाल्याने दाखवावे, असा सल्ला ओवैसी यांनी दिला.
मुसलमानांनो तुम्ही गरीब नाही. तुम्हाला चहाविषयी ऐकायचे आहे ना. मी कोणाला उत्तर देण्यासाठी आलो नाही. तुमची लायकी नाही की तुमच्या प्रश्नाला उत्तर मी द्यावे. पुन्हा येईल आमखास मैदानावर, तेव्हा बोलेल. वेळ मी निश्चित करेल, असे सूतोवाच त्यांनी आगामी औरंगाबादेतील सभाबाबत केले.