सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दोन दिवस मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे गावच्या यात्रेसाठी आले आहेत. परंतु गावाकडे येताच त्यांनी पहिल्यांदा शेतात जावून पिकांची पाहणी केली. राज्यात सर्वत्र मुख्यमंत्री यांची शेतीचा विषय चर्चेत असतो. त्यामुळे गावाकडील या शेतीत नक्की कोणकोणती पिकं आहेत, याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. कारण हेलिकॅप्टरमधून जाणारा शेतकरी या विधानामुळे मुख्यमंत्र्यांची शेती नेहमीच चर्चेत असते. तर मुख्यमंत्र्याची संपूर्ण सेंद्रीय शेती आहे.
मुख्यमंत्री याच्या शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद या सह लाल चंदन, बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली आहे. एकनाथ शिंदेंच्या शेतामध्ये असलेलं गवती चहाचं पिक आगळं वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल 10 फुट आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे येथील मूळ गावी शेतीची पाहणी केली. त्यांनी चार महिन्यांपूर्वी लावलेल्या स्ट्रॉबेरीला आता लालभडक फळे आली आहेत. ही स्टॉबेरी त्यांनी हाताने तोडून त्याची चव चाखली. रोजच होत असलेलं राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी शेतात रमले आहेत.