शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांच्या गाडीला भीषण अपघात, मुंबई-गोवा महामार्गावर डंपरची धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपूत्र, आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर परिसरात अपघाताची घटना घडली. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिंदे गटाचे आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजिक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर पलटी झाला आणि अपघातात धडक दिलेल्या टॅंकरचा चालक मात्र पळून गेला. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले.

यावेळी त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरिता त्यांना दाखल करण्यात आले आहे. रूग्णालयात आमदार योगेश कदम जातीने उपस्थित आहेत. आमदार योगेश कदम हे दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार योगेश कदम आणि त्यांचा ड्रायव्हर यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना काही वेळात मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.