हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतात येत्या 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरी केला जाईल. संविधानामुळेच आपल्याला स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु भारतीय संविधानाने नागरिकांना इतरही अनेक अधिकार दिले आहेत. ज्यामुळे आज आपण कुठेही वावरू शकतो, मुक्तपणे संवाद साधू शकतो आणि आपल्या हक्कांसाठी लढू शकतो. आज आपण संविधान दिनानिमित्त याच अधिकारांविषयी जाणून घेणार आहोत.
मूलभूत अधिकार
1) समतेचा हक्क (कलम 14 ते 18) –
भारतीय संविधानात सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे समानतेचा. हा अधिकार आपल्याला हे सांगतो की, कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. कायदा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. तसेच, सर्वांना समानतेची वागणूक देतो. समानतेच्या अधिकारात देशातील कोणत्याही नागरिकावर धर्म, जात, लिंग, यावरून भेदभाव करण्यात येत नाही.
2) अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कलम 19 ते 22) –
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सर्व हक्कांचा आत्मा आहे. या अधिकारामुळे भारतातील कोणताही नागरिक भारताच्या कोणत्याही भागात संचार, वास्तव करू शकतो. तसेच तो, कोणताही व्यवसाय करू शकतो. इतकेच नव्हे तर, आपण आपल्याला हवे ते लिहू शकतो बोलू शकतो विचार करू शकतो. या अधिकारामुळे आपण विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करू शकतो
3) शोषणाविरुद्धचा हक्क (कलम 23 आणि 24) –
शोषणाविरुद्धचा हक्क आपल्याला आपल्या सोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार देतो. बालमजुरी, अत्याचार, लैंगिक शोषण, कामाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे शोषण अशा प्रत्येक शोषणाविरोधात आपण आवाज उठवू शकतो. या अधिकारामुळे आपण भारतात राहत असताना आपल्यासोबत होणाऱ्या शोषणाविरोधात आपण आवाज उठवू शकातो.
4) धर्मस्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28) –
धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे भारतातील नागरिक त्याला आवडणारा आणि त्याला हवा असणारा धर्म स्वीकारू शकतो. धर्म स्वीकारण्याबाबत किंवा त्याचे पालन करण्याबाबत दुसरा व्यक्ती त्या व्यक्तीवर कोणतीही जबरदस्ती करू शकत नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्मानुसार, आचार प्रचार करण्याचा अधिकार आहे.
5) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क ( कलम 29 ते 30) –
या अधिकारामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तसेच, प्रत्येक व्यक्तीला सांस्कृतिक मूल्य जपण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर, प्रत्येक व्यक्तीला त्याची भाषा, लिपी वा संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. शैक्षणिक अधिकारामुळे देशातील प्रत्येक घटक त्याला हवे ते शिक्षण घेऊ शकतो.
6) घटनात्मक उपाययोजनेचा हक्क (कलम 32) –
आपल्या मूलभूत अधिकाऱ्यांना गदा आल्यास दाद मागण्याचा अधिकार घटनात्मक उपाययोजनेत देण्यात आला आहे. थोडक्यात, या अधिकारामार्फत प्रत्येक नागरिक त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास पुनर्संचयित करू शकतो. त्यामुळे सर्व अधिकारात हा अधिकार सर्वात महत्वाचा आहे.




