भारताचे माजी राष्ट्रपती, महान संशोधक, भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ‘वाचन’ याविषयी लिहितं केलं. आपल्या आयुष्यात वाचनाचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरुणाईने केला. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत त्यांची ही धडपड पोहचवत आहोत.
वाचनामुळे आयुष्यातले निर्णय घ्यायला मदत झाली – सायली राजेंद्र सावंत
वाचनाने सगळयाच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. एखादी गोष्ट संवेदनशीलपने तसेच तेवढ्याच तटस्थपणे कशी सोडवता येईल हे ही कळालं. कधी मनाला हवा असणारा निवांतपणा तर कधी लेखकाशी जोङलं जाण्याचा अनुभव मिळाला. वाचनामुळे आयुष्यातले निर्णय घ्यायला मदत झाली. काम, जबाबदारी आणि आयुष्याच्या वेगवेगळया वळणांवर मार्गदर्शन मिळत गेल. वाचनानी एक व्यक्ती म्हणून मी जास्त समृद्ध होत गेले. माणूस म्हणून घङत गेले. नवनवीन गोष्टी शिकत गेले. कोणत्याही गोष्टीकङे समाजाचा एक जागरुक नागरिक म्हणून बघण्याचा दृष्टिकोन वाचनाने मला दिला. आजच्या धावपळीच्या जगात, digital युगात पुस्तके आणि वाचनामुळेच विचारांची देवानघेवाण चालु आहे. आणि म्हणूनच माणूस म्हणून मी अजुन समृद्ध होत आहे. माझ्या आयुष्याची गोष्ट, बिनपटाची चौकट, गोष्टी माणसांच्या, मृत्युंजय, मुसाफिर, धङपङणारया तरूणाईसाठी, वर्पुझा, अस्तित्व, Wise and Otherwise, ङाॅ. प्रकाश बाबा आमटे, मुसाफिर यांसारख्या अनमोल पुस्तकांच्या वाचनांनी मनात एक वेगळ विश्व निर्माण केलं आणि अर्थातच आयुष्य जगायला शिकवलं.
वाचन विसरतो तेव्हा जाणिवा मरतात – दीप्ती घाडगे
बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे, “समाजातील जाणिवा जेव्हा मरतात ना, तेव्हा उरतात ती फक्त जिवंत प्रेतं..” आणि मला वाटतं या जाणिवा केवळ यामुळेच मरतात कारण आपण वाचायला विसरलोय…!! आपण वाचायला विसरलोय अनाथांची माय सिंधुताईंना, गोरगरिबांसाठी आयुष्य वेचलेल्या मदर तेरेसांना, आपल्या लोकांसाठी आपलं आयुष्य पणाला लावलेल्या सर्वच महापुरूषांना…!! वाचन देते विचारांना प्रगल्भता. वाचनाने बुद्धीचा विकास होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी म्हणून प्रसिद्ध होते. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी स्वतःला ग्रंथालयात अक्षरशः कोंडून घेतले होते आणि मला वाटतं त्यामुळेच भारतासारख्या देशाच्या राज्यघटनेचे ते शिल्पकार झाले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तकांचे महत्त्व कमी होत चालले आहे पण याच तंत्रज्ञानाने वाचनाचे ई-बुक्स, ई न्युजपेपर, इत्यादी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मग याच तंत्रज्ञानाचा वापर आपण कुठपर्यंत आणि कशासाठी करायचा याचा विचार करणे गरजेचे आहे.
मृत्युंजय – अपराजित योद्धयाची कहाणी; नात्यांमधील भावनिकता उलगडून दाखवणारी – भक्ती चंद्रकांत पानसरे
वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बसल्या जागी एका नवीन दुनियेतून सफर करून येतो हे फक्त मी ऐकलं होतं पण मृत्यूंजय कादंबरी वाचल्यानंतर मला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. जिवंत महाभारत या कादंबरीमुळे मला बघायला मिळालं. कर्णाची ही शौर्यगाथा वाचताना कधी ओठांवर स्मितहास्य तर कधी गालांवरून घरंगळते दोन अश्रू….खरंतर मृत्यूंजय म्हणजे सुर्यपूत्र धुरंधर योध्याच्या फक्त शौर्याची गाथा नाही तर ती कथा आहे त्याच्या उपहासाची….सारथीपुत्र म्हणून सतत वाट्याला आलेला उपहास सहन करणाऱ्या एका संयमी महामेरूची.त्यामधून मला उमजलेला कर्ण ही कोणी व्यक्ती नाहीच ती आहे वृत्ती…असीम दानाची, अभेद्य पराक्रमाची,त्यागाची अन तपस्येची. कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री म्हणजे तर नात्यामधल्या भावनिकतेला हात लावणाराच विषय.
आपला मित्र दुर्योधन कितीही दुष्ट असला तरी केवळ मैत्रीचा विलक्षण अर्थ आपल्याला देत ती मैत्री त्याने शेवटपर्यंत टिकवून ठेवली. सूर्याचा तेजस्वी पुत्र स्वतःची कवचकुंडले एका भिक्षुकीला दान करताना रक्ताने माखलेल्या शरीराची पर्वा न करता पराकोटीचं औदार्य दाखवणारा कर्ण…आपल्या गुरुची झोपमोड होऊ नये म्हणून स्वतःची मांडी पोखरून घेणारा कर्ण..असा शिष्य ज्या महाकाव्याने दिला त्याची गाथा उलगडणारी कादंबरी म्हणजे मृत्युंजय.या पुस्तकाने महाभारताकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला.दिग्विजयी कर्णाची पावलोपावली झालेली अवहेलना सांगितली.जी संवेदनशील वाचकांच्या मनात खोलवर वार करून जाते.भावनेचा कल्लोळ माजवणारी ही कादंबरी प्रत्येक वाचकाने एकदा तरी नक्की वाचावी.