वाचनानं आम्हाला काय दिलं ? – भाग २

भारताचे माजी राष्ट्रपती, महान संशोधक, भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ‘वाचन’ याविषयी लिहितं केलं. आपल्या आयुष्यात वाचनाचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरुणाईने केला. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत त्यांची ही धडपड पोहचवत आहोत.

वाचाल तर वाचाल आणि आयुष्याची लढाई जिंकाल – नौशाद दादुभाई तांबोळी

वाचनाचे महत्व शब्दात सांगणे फारच कठीण आहे. समर्थ रामदासांनी मात्र वर उद्धत केलेल्या ते नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे. आजकाल करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झाला आहे. याचा परिणाम वाचन कमी होण्यात होत आहे. रे ब्रॅडबरी या विचारवंताने म्हंटले आहे.

“You Dont Have To Burn Books To Destroy a Culture,
Just Get Peoples To Stop Reading Them”.

म्हणूनच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे हि बाब आज अतिशय निकडीची झाली आहे. कोणत्याही ज्ञानशाखेला सतत अद्ययावत राहण्यासाठी सतत वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचन हे केवळ मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी असू नये किंवा त्याचा तेवढाच मर्यादित उद्देश असू नये. ज्ञानप्राप्ती हा त्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. ग्रंथाना गुरु म्हंटले आहे ते याच अर्थाने. मार्गारेट फुलर म्हणतात की,

Today A Reader, Tomorrow A Leader.

कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान, नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाला अन्य पर्याय नाही. वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मानवी जीवनात लेखक महत्वाची भूमिका बजावतात.एक चांगले पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात –

“पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञानाबरोबर नेहमीच आनंद मिळालाय. माझ्या घरात अध्यात्म, विज्ञान, प्रशासन, इतिहास, भूगोल, व्यवस्थापन आणि वाड्मय अश्या विविध विषयांचा त्यात समावेश आहे. माझं ग्रंथ संग्रहालय ही माझी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा व समाधानाचा आहे.”

प्रगत विकसित देशात युवकांच्या वाचनाचा आढावा नेहमी घेतला जातो. मित्रानो, आपल्या महाराष्ट्रचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे पट्टीचे वाचक होते. कोणत्याही दौऱ्यावर असताना प्रवासात त्यांनी अनेक पुस्तके वाचल्याच्या नोंदी आहेत. उत्तमोत्तम पुस्तके विकत घेऊन ती वाचण्याचा त्यांचा छंद होता. त्यांनी केलेला संग्रह त्यांच्या रसिक वृत्तीची साक्ष देणारा आहे. म्हणूनच, “युवक वाचतील तर देश वाचेल”

आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त आधुनिक जीवनात, इंटरनेट, वायफाय असे अत्याधुनिक साधन आली खरी पण पुस्तक वाचन संस्कृतीचा -हास झाला. इंटरनेटच्या माध्यमातुन असंख्य वेगवेगळ्या क्षेत्राशी निघडीत पुस्तक एक क्लिक वर वाचता येऊ लागली. याचा परिणाम असा झाला कि, छापील पुस्तक साहित्य विकत घेऊन वाचणा-यांची संख्या कमी-कमी होत गेली. त्यात प्रत्येकाच्या जीवनातला वाढता कामाचा व्याप, व्यस्त जीवन पद्धतीमुळे मनाचा ताणतणाव वाढतच गेला. मग पुस्तक मित्रांशी प्रत्येकांचा मित्रत्वाच नातं दुर-दुर होत गेलं.

“पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक,
विचार प्रगल्भतेत वाढ करणारे ज्ञानाचे भांडार”

याचा जणु सर्वाचा विसरच पडत गेला. शालेय पाठ्यपुस्तकांचा, दफ्तराचा वाढता बोजा यांमुळे मुलांना अवांतर वाचनाकरिता वेळ मिळेनासा झाला. आजची तरूणाई सोशल नेटवर्किगच्या इतकी आहारी पडली की, पुस्तकवाचनच दुरापास्त होत गेले. पण आता वेळ आली आहे, हे सारं बदलुन पुस्तक मित्रांचे महत्व पटवुन देण्याची. पुस्तकाशी घट्ट मैत्री जोडण्याची तरच या वाचन संस्कृतीचा होणारा -हास थांबवता येईल. पुस्तकांच्या जगात एकदा डोकावुन तर पहा आपल्या ज्ञानार्जनाबरोबरच मनोरंजनही होईल. पुस्तकातील वेगवेगळ्या पात्रांचे, घटनांतील भाव, प्रेरणात्मक आशय मनातील नकारात्मक विचार दुर करून नवा उत्साह वाढवायला मदत करेल. वाचनाचे फायदे आयुष्य जडणघडणीत, विचार सामर्थ्यात विशेष भर घालणारे, उज्वल भवितव्य घडविणारे असते. ‘वाचाल तर वाचाल’या विचारांप्रमाणे प्रत्येकांनी वाचनाचे महत्व जाणायला हवे. पुस्तकांशी प्रत्येकाने असलेले मैत्रीचे घट्ट नाते अबाधित राखायला हवे तरच वाचन संस्कृतीचा होणारा -हास रोखला जाऊन, उद्याचे सोनेरी विचारात्मक आणि प्रगल्भ भविष्य साकारले जाईल.

WhatsApp Image 2019-10-14 at 18.47.00
नौशाद दादुभाई तांबोळी वर्ग-B.Sc 1 (Nanoscience)

 

वाढदिवसाला भेट ही पुस्तकाचीच हवी – साहिल प्रणिता प्रविण पाटील.

माझा मराठी साहित्य वाचण्याचा फारसा योग जुळून आला नाही. मला वाचण्याची सवय सौ. विद्या नायक, (माझ्या शिक्षिका) यांच्याकडून लागली आणि तेव्हापासून इंग्रजी साहित्य वाचण्याची आवड मला लागली. ‘The adventures of Tom Sawyer’ (Author : Mark Twain), ‘Robinson Crueso’ (Author : Daniel Defoe), ‘Gulliver’s Travels’ ( Author: Jonathan Swift) या काही प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीं पासून सुरू झालेला प्रवास आजतागायत चालू आहे आणि यापुढेही कायम चालू राहील. अगदी सुरुवातीला वाचनाची सुरुवात नवीन भाषा शिकायची म्हणून झाली. त्यानंतर या भाषेच्या ओघात आपण कसे वाहत गेलो कळालेच नाही. आज मागे वळून याकडे पाहिले तर लक्षात आलं की हा प्रवास खरंच वाखाणण्याजोगा होता. कादंबरी वाचण्याचा हा ओघ मला माणसाच्या मनाच्या संकल्पना उलघडण्याकडे घेऊन गेला. ‘The Power of Your Subconscious Mind’ ( Author: Joseph Murphy), या पुस्तकातून माणसाच्या क्लिष्ट मनाच्या संकल्पना जाणून घेण्यास मदत होते. शेवटी एवढंच म्हणेन की एखाद्याच्या वाढदिवसाला खरंच काही करायची इच्छा असेल तर एखादे छानसे पुस्तक त्या व्यक्तीला द्यावे.

WhatsApp Image 2019-10-14 at 16.35.22
साहिल प्रणिता प्रविण पाटील. Class: 4th year Branch: Mechanical Engineering Government College of Engineering, Karad.

वाचनामुळे मी संयम राखायला शिकलो – संकेत भोसले

मला वाचनामुळे खूप फायदे झाले. वाचताना आपण इतरांचे मनोगत ऐकत असतो. वाचनामुळे मला इतरांचे ऐकण्याची सवय लागली. ऐकण्यासाठीचा संयम खूप वाढला. वाचनामुळे मी संयम राखायला शिकलो . हा सगळ्यात मोठा बदल माझ्यात घडताना मी पाहिला. तो मला वेळोवेळी जाणवतो देखील. वाचनामुळे माझ्या भाषेत सुस्पष्टपणा आला. थोडक्या शब्दांमध्ये अचूक मत मांडता येऊ लागले. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे माझ्या संकुचित मनाला व्यक्त होण्याची दिशा सापडली. हळूहळु मनाचा एकाकीपणा नाहीसा झाला.

मला कादंबरी वाचायला खूप आवडते. त्यातीलच एक म्हणजे ” शिवाजी सावंत ” लिखित ” छावा” कादंबरी. या कादंबरीमुळे मी माणसं ओळखायला शिकलो, माणूस वाचायला शिकलो. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याविषयी आदर, प्रेम, आपुलकी होतीच परंतु ह्या कादंबरीमुळे मी स्वतः साठी न जगता इतरांसाठी जगण्याची, झगडण्याची भावना वाढीस आली. आदर, प्रेम ह्या गोष्टी मनातून अगदी स्पष्टपने व्यक्त होऊ लागल्या. प्रत्येकाचं मत समजून घेऊन त्यांच्या मताला अनुसरून थोडक्या शब्दांमध्ये सुस्पष्टपणे मत मला मांडता येऊ लागले. जगण्यात विचारात खूप मोठा बदल घडला. त्याचबरोबर विचारांचा कक्षा रुंदावत गेल्या.

WhatsApp Image 2019-10-14 at 18.47.29
संकेत भोसले बी .एस्सी भाग 3, कॉम्प्युटर सायन्स. वायसी कॉलेज, सातारा

—————————————————————————————————————————————–

You might also like