औरंगाबाद – यावर्षी मंडळामार्फत शाळा तिथे परीक्षा केंद्र या पद्धतीने दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला परीक्षेच्या काळात वारंवार परीक्षा केंद्र बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. आतापर्यंत शिक्षण विभागाने भौतिक सुविधा नसलेले तब्बल सात परीक्षा केंद्रे बदलली आहेत.
राज्य मंडळाकडून बारावीची चार मार्च; तर दहावीची 15 मार्चपासून परीक्षा घेण्यात येत आहे. बारावीच्या पहिल्याच पेपरला ग्रामीण भागातील काही केंद्रांवर भौतिक सुविधांचा अभाव दिसून आला. त्यात एका परीक्षा केंद्रावर चक्क लग्नाचा मंडपच टाकण्यात आला होता; तर एका ठिकाणी मसाला कांडप केंद्राच्या गोडाऊनमध्येच परीक्षा घेण्यात येत होती. यासह जिल्ह्यातील काही केंद्रावर लाईट, फॅन, पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे आढळून आले होते.
याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी सुटीच्या दिवशी तातडीने बैठक परीक्षा केंद्रावरील सुविधांची खातरजमा केली. तसेच पुढे असे प्रकार घडू नये, त्यामुळे शंका असलेल्या शाळांच्या सुविधांची खातरजमा करण्याचे आदेश दिले. तसेच एखाद्या केंद्राकडे सुविधा नसतील तर कळवावे, त्यांचे तातडीने केंद्र बदलण्यात येतील, असे सर्व परीक्षा केंद्राना कळविले. मात्र, शिक्षण विभागाच्या सूचनांकडे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांनी दुर्लक्ष करीत अभाव असलेल्या केंद्रावर परीक्षा घेणे सुरूच ठेवले. त्यामुळे आता ऐन परीक्षा काळात अनेक केंद्रांचे पितळ उघडे पडायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दोन केंद्रावर भौतिक सुविधा नसल्यामुळे कारवाई करून मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच तेथील परीक्षा केंद्र देखील बदलण्यात आले आहे.
आतापर्यंत बदलण्यात आलेली केंद्रे –
– स्वप्नपूर्ती महाविद्यालय गेवराई तांडा ऐवजी सरस्वती भुवन विद्यालय.
– लक्ष्मीबाई विद्यालय निलजगावऐवजी सुरेखा शंकरसिंग नाईक शाळा बोकूड जळगाव.
– ज्ञानांकुर विद्या मंदिराऐवजी संत एकनाथ विद्यालय चितेगाव, (ता.पैठण).
– माध्यमिक विद्यालय हिरडपुरी ऐवजी पंढरीनाथ पाटील विद्यालय टाकळी अंबड.
– ऊर्दू हायस्कूल, नवगाव ऐवजी त्र्यंबकेश्वर विद्यालय.
– नूतन आर्टस कॉलेज ऐवजी नॅशनल मराठी प्राथमिक शाळा कायगाव, (ता.सिल्लोड).
– अब्दुल कलाम विद्यालय, सुलतानपूर ऐवजी राजे शहाजी विद्यालय वडोद बाजार.