हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बघता बघता 2023 वर्ष सरत आलं आहे. त्यामुळे सध्या नूतन वर्षाच्या आगमनासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. परंतु तत्पूर्वी 2023 मध्ये कोणत्या क्षेत्रात नेमक्या काय घडामोडी घडल्या हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचे आहे. आज आपण भारतीयांसाठी एखाद्या धर्माप्रमाणे असणाऱ्या क्रिकेट क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर याच वर्षी देशभरातील तमाम क्रिकेटप्रेमींना आपल्या हृदयावर दगड ठेवून वर्ल्ड कपचा पराभव स्वीकारावा लागला. तर दुसऱ्या बाजूला आनंदाची बाब अशी घडली की, आशिया कपवर टीम इंडियाने विजयाने आपले नाव कोरले. खरे तर 2023 वर्षात क्रिकेट विश्वामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे World Cup, दुसरी म्हणजे IPL आणि तिसरी म्हणजे Asia Cup! आज आपण याच घडामोडींचा थोडक्यात आढावा जाणून घेणार आहोत.
IPL 2023
एप्रिल- मे महिन्यात पार पडलेल्या IPL कडे संपूर्ण देशाचे लक्ष्य होते. 59 दिवस सुरु असलेल्या देशातील सरावात मोठ्या क्रिकेट लीग मध्ये 74 सामन्यांमध्ये दहा संघ सहभागी झाले होते. यंदाची स्पर्धा हि आत्तापर्यंतची 16 वी स्पर्धा होती. या स्पर्धेत कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत IPL ट्रॉफी आपल्या नावावर केली.
Asia Cup
भारतासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा आशिया चषक 2023 हा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळला गेला. 2023 च्या आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा पहिल्यांदाच पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळली गेली. मुख्य म्हणजे, या स्पर्धेमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला हरवत आशिया एशिया कप 2023 आपल्या नावावर केला. यावेळी कोलंबो येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला.
Wold Cup 2023
यानंतर आला तो म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप … सर्व भारताचे लक्ष लागून राहिलेल्या वर्ल्ड कपला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात झाली. 5 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये भारतातल्या विविध शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने पार पडले. यामध्ये, भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोंबर रोजी झाला. यावेळी भारताने पाकिस्तानचा पराभव करत पुढील सामन्यांसाठी आगेकूच केली. तसेच सेमी फायनल मध्ये न्यूझीलंडचा पराभव करत दिमाखात फायनल मध्ये प्रवेश केला मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा सह सर्वच भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले. वर्ल्ड कप मधील पराभव हा भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.
ऑलम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश
2023 मध्ये सर्वात आनंदाची गोष्ट ही घडली की, तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यास मान्यता मिळाली. मुंबईत झालेल्या IOC मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर आता 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. यापूर्वी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे शेवटचे सामने खेळले गेले होते. त्यानंतर आता थेट 2028 मध्ये ऑलम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा सामना रंगणार आहे.