आपल्या मराठीला नक्की झालंय काय ? मराठीची वाट लावणाऱ्या मराठी बांधवांना अनोख्या शुभेच्छा..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा…आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा.

खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणा-या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा. दूरध्वनीवरचे संभाषण हिंदी इंग्रजीतून झाडणा-या, आपला रुबाब वाढवण्यासाठी मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणा-या लोकांना त्रिवार शुभेच्छा..

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणा-या किंवा टीसी (काळजी घे चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा, तसेच शब्दांचे मूळ रूप विद्रूप करून तै, बै, वेग्रे, लोक्स, कळतै, पैले असं पिळून काढलेलं स्वरूप देणाऱ्या प्रतिभावंतांनाही शुभेच्छा.. सोशल मिडीयावर लेखन करताना दर वाक्यात इंग्रजी शब्द घुसडून लेखनाचे पुण्यकर्म करणा-या महालेखकांनाही सकळ शुभेच्छा.

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर ढेकणांचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय, त्यांनाही शुभेच्छा. सार्वजनिक ठिकाणी, समारंभ वा सोहळ्यात मराठीचा वापर केल्यास कमीपणा येतो असं समजणा-या मराठीजणांना तर अत्यंत मनस्वी शुभेच्छा.

आपल्या समोरील माणूस मराठीत बोलतो हे लक्षात आल्यावर अंगावर पाल पडल्यागत चेहरा करणा-या मराठी माणसासही खूप खूप शुभेच्छा. सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यात, बँकेत किंवा अनाहूत स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना मराठीचा किमान एका संधीसाठीही वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा.

मराठी वर्तमानपत्र विकत न घेणा-या, वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकापासून दूर राहणा-या तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

आपली स्वाक्षरी मराठीत करता न येणा-या, मराठी अंक लिहिण्यास असुलभता वाटणा-या, जाणीवपूर्वक चुकीचे उच्चार करणा-या सर्व मराठी भाषक जनतेस मराठी दिनाच्या अगणित शुभेच्छा. मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा. मराठीत लेखन केलं जावं म्हणून वा मराठीत बोललं जावं म्हणून कधीही, कुठेही आग्रह न धरणा-या भेकड मराठी माणसालाही मराठी दिनाच्या शुभेच्छा…

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा. मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा. जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा ऐकून, पाहून सोडून दया. आपण मराठीभाषेचा सिंहनाद करणार आहोत की पिपाणी वाजवणार आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मराठी भाषिक आणि मराठी प्रेमी या नात्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सर्वांनाच या शुभेच्छा..!!

 शब्दांकन – समीर गायकवाड

Leave a Comment