IAS अधिकारी शुभम गुप्ता प्रकरण नेमकं काय आहे? महाराष्ट्राची यामुळे बदनामी होतेय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाव – शुभम गुप्ता… (Shubham Gupta) काम – IAS अधिकारी… सध्याचा मुक्काम पोस्ट – सांगली… निसर्गाला हानी पोहोचू नये म्हणून व्हिजिटिंग कार्ड मध्ये झाडांचे बिया टाकून मोठमोठ्या पेपरला बातम्या लावून त्याने हवा केली होती… आता यानेच महाराष्ट्रातल्या गोरगरीब आदिवासींचे पैसे खाल्लेत… भामरागड येथे आदिवासींसाठी गाईवाटप प्रकल्प राबवताना त्याने शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या भाकड गाईंना पकडून दुभती जनावरं म्हणून आदिवासींना वाटली… त्याबदल्यात एका गाईमागे एक लाख रुपये खाल्ले, असा ठपका त्याच्यावर आहे… प्रशिक्षणार्थी म्हणून महाराष्ट्रात पाऊल ठेवल्यापासूनच या अधिकारी महाशयांचे अनेक कारनामे आता उघडकीस येऊ लागलेत… पूजा खेडेकर नंतरचा महाराष्ट्रातला हा शुभम गुप्ता नावाचा चॅप्टर टू नेमका आहे तरी काय? बनावट सर्टिफिकेट, धमक्या ते डुबलीकेट डॉक्टर असा सगळा बनाव करून या सांगलीच्या कलेक्टरने गाई म्हशींच्या व्यवहारात कोटींचा घोळ कसा घालून ठेवलाय? त्याचे सत्तेतील कुण्या मोठ्या मंत्र्याशी काही लागेबंध आहेत का? याच शुभम गुप्ता याची याआधीच्या धुळे, नागपूर इथल्याही पोस्टिंग कशा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या होत्या, त्याचीच ही ए टू झेड कहाणी….

प्रकरणामुळे जितकी व्हायची तितकी बदनामी झालेली असताना आता याचा दुसरा अंक महाराष्ट्रात सुरू झालाय ज्याचं नाव आहे… 2018 ला वयाच्या उमेदीतच 6 वा रँक घेत आयएस झालेल्या याची चांगलीच हवा झाली होती… सध्या सांगली महापालिकेचे आयुक्त म्हणून ते काम करतात… आपल्याला एक तरुण तडफदार अधिकारी भेटलाय म्हणून सांगलीकरांनाही त्याचं कौतुक होतं… पण याच गुप्तानं आदिवासींच्या गाई म्हशींच्या वाटप योजनेमध्ये मोठा घोटाळा घालून ठेवलाय.. प्रकरण काय आहे? सविस्तर सांगतो…आदिवासी समाजाचा विकास व्हावा यासाठी आदिवासी विभागामार्फत अनेक योजना आहेत. त्यातील आदिवासी लाभार्थ्यांना दुधाळू गाई म्हशींचे वाटप केलं जातं. त्यातून त्यांना उत्पन्न प्राप्त होईल, म्हणून सरकार ही योजना चालवतं… गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी विकास प्रकल्पामध्ये अशाच गाई म्हशींचं वाटप करण्याची योजना आली… यावेळी प्रकल्प अधिकारी म्हणून प्रशिक्षणार्थी होते आयएएस अधिकारी शुभम गुप्ता…

IAS अधिकारी Shubham Gupta प्रकरण नेमकं काय आहे? महाराष्ट्राची यामुळे बदनामी होतेय | Sangali News

योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्याला 50 हजार रुपये दिले जातात… शुभम गुप्ता याला त्याची जाणीव असतानाही त्यांनी प्रति लाभार्थी एक लाख रुपये देऊन शासनाचं नुकसान केलं. रस्त्यावरती फिरणाऱ्या भाकड गाई- म्हशींना बिल्ले मारून ते लाभार्थ्यांना वाटप केलं. ही दुभती जनावरं घेण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट एक लाख रुपये पाठवले. आपल्या अधिकाऱ्यांना सांगून या लाभार्थ्यांना बँकेत बोलावलं आणि जमा झालेले एक लाख रुपये त्यांनी दुसऱ्या खात्यामध्ये वर्ग केले. याची तक्रार कुठेही होऊ नये, यासाठी त्या लाभार्थ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये त्यामधून दिले. ज्या लाभार्थ्यांनी पैसे घेण्यास नकार दिला त्यांना जास्तीत जास्त तीस हजार रुपये देण्यात आले. तेही घेण्यास ज्यांनी नकार दिला तेव्हा त्यांना थेट धमकी देण्यात आली…यापुढे तुम्हाला कुठलीही योजना मिळणार नाही. हे सर्व चुकीचं होत असल्याचं कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही धमकावून शुभम गुप्ता यांनी तुझी बदली करू, तुझी चौकशी लावू, अशा स्वरुपाच्या धमक्या दिल्या….

अनेक अधिकारी अनुकंपा तत्त्वावर लागल्यानं त्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे तुम्हाला कामावरून काढून टाकू, असं शुभम गुप्ता यांनी थेट धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. या योजनेत जनावरांच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी पशु चिकित्सक यांचं सर्टिफिकेट आवश्यक असताना तोतया डॉक्टरला उभं करून बनावट सर्टिफिकेट शासनाला सादर केलं. या योजनेची तक्रार होण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत चौकशी समिती तयार झाली. मात्र, या गुप्तानं या समितीवरही दबाव टाकून आपल्याला अपेक्षित ते सर्व बदल करून घेतले. अखेर अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांच्या अंतर्गत एका समितीनं सर्व लाभार्थ्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यातून शुभम गुप्ता हे दोषी असल्याचं आढळून आलंय .. आता आदिवासी विभागानं गुप्तावर कारवाई करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला हा संपूर्ण अहवाल पाठवलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग आता या अहवालाचा इंग्रजीत भाषांतर करून दिल्लीतील डी.ओ.पी.टी.कडे शुभम गुप्तावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार आहे….

या गुप्ताचा जुना रेकॉर्डही चांगलाच संशय, गोंधळ आणि वादाचा राहिलाय… नागपुरमधल्या एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती… दोन वर्षानंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आले आहे… आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असताना देखील गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिक दृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहीका खरेदी केल्या होत्या. त्या आज धुळखात पडून आहेत…हे झालं नागपूरचं… धुळ्यातही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून पदावर असताना त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेत घेत अविश्वास आणण्यात आला होता… त्यांची बदली झाल्यावर धुळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकमेकांना पेढे वाटल्याचं विचित्र चित्र बघायला मिळालं होतं…

आदिवासी गाईवाटप प्रकरणात गुप्ता दोषी आढल्यावर आता त्याच्या भ्रष्टाचाराच्या गोपाळ काल्याबद्धल सर्वच स्तरातून टीका होऊ लागलीय… भामरागडच्या आदिवासी समाजानं शुभम गुप्तावर लवकरात लवकर ॲट्रॉसिटी लावण्यात यावी… नाहीतर आंदोलनाचा इशारा दिलाय… तर दुसऱ्या बाजूला शुभम गुप्ता याची सांगलीतून हकालपट्टी करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडीही आक्रमक झालीये… त्यात शुभम गुप्ता याला एकनाथ शिंदे यांच्या खास मर्जीतले अधिकारी म्हणून बघितलं जातं, अशीही प्रशासकीय वर्तुळात नेहमी चर्चा असते… त्यामुळे एवढे सारे कारनामे करूनही कारवाईची प्रक्रिया इतक्या धिम्या गतीने नेमकी कशामुळे सुरू आहे? या गुप्ताचे राजकीय नेत्यांशी काही कनेक्शन्स आहेत का? याचीही कसून चौकशी करण्याची मागणी आता होत आहे… पूजा खेडेकर, शुभम गुप्ता यांसारख्या अधिकाऱ्यांना नेमकं पाठीशी कोण घालतय? राज्यातील बड्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्यातच झोलमाल होत असेल, तर सर्वसामान्य जनतेनं कुणाकडे मदतीचा हात मागवा? हाही मोठा प्रश्न आहेच… बाकी शुभम गुप्ताला नेमक पाठीशी कोण घालतय? या सगळ्या प्रकरणावर तुमचा अँगल काय सांगतोय? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…