मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचा मुंबई उत्तर पश्चिमचा (Mumbai North East Lok Sabha 2024 Result) निकाल लागला… ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्या विरोधात शिंदेंच्या रवींद्र वायकरांचा (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजय झाला… पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर अशा काही गोष्टी एका मागून एक घडायला लागल्या…ज्यामुळे ईव्हीएम पासून ते निवडणूक प्रक्रियेवरच एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं? त्यात मतमोजणी केंद्रावर वायकरांच्या मेव्हण्यानं मोबाईल फोन वापरल्याचा प्रकार समोर आल्यानं ‘दाल में कुछ तो काला है’ असं म्हणत या प्रकरणात एका मागून एक ट्विस्ट घडत आलेत… वायकर, त्यांचा मेव्हणा आणि त्याने वापरलेला मोबाईल फोन यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा, ईव्हीएम मशीन, जिल्हाधिकारी ते थेट निवडणूक आयोग अशी भली मोठी सिस्टीमच कशी अडचणीत आलीये? एका छोट्याशा मोबाईलवरून अमोल कीर्तीकरांच्या बाजूने असणारा निकाल फिरवण्यात आला का? मुंबई उत्तर पश्चिमचा खराखुरा खासदार कोण? याच सगळ्या घटनांचं केलेलं हे डिकोडींग…

तर विषय सुरू झाला तो चार जूनला…मुंबई उत्तर पश्चिमच्या मतदानाची मोजणी गोरेगाव नेस्को मैदानाच्या मतमोजणी केंद्रावर सुरू झाली…अमोल कीर्तीकरांच्या बाजूने असणारं वारं पाहता वायकर इथून निसटती लढत देतील असा अंदाज होता… पण मतमोजणीच्या पहिल्याच कलांपासून कीर्तीकर वर्सेस वायकर या लढतीत कट टू कट फाईट पाहायला मिळाली… एका मागून एक फेऱ्या मागे पडत गेल्या आणि शेवटच्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर अमोल कीर्तीकरांना 681 मतांच्या लिडने विजयी घोषित करण्यात आलं…पण वायकरांना हा निकाल काही पटला नाही.. त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली…आणि या मतमोजणीत वायकरांना 75 मतांची आघाडी मिळाली… यावर आक्षेप घेत आता कीर्तीकरांनी फेर मतमोजणीची मागणी केली…आणि यात इंटरेस्टिंग रित्या ट्विस्ट येत किर्तीकर एका मताने विजयी झाले…

YouTube video player

ईव्हीएम मशीन मधला हा सगळा घोळ पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल बॅलेट मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला… हा सगळा प्रकार रात्री दहापर्यंत चालला… आणि शेवटी मोजणीनंतर रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून 48 मतांच्या लीडने विजयी घोषित करण्यात आलं… एकदाचा काय तो निकाल लागला, म्हणत सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला…पण पराभूत झालेल्या कीर्तीकरांना निकालात काहीतरी घोळ असल्याचा संशय आला… निकालाच्या दिवशी काही संशयास्पद गोष्टी घडल्या आहेत…असं म्हणत त्यांनी मतमोजणी ज्या ठिकाणी झाली तिथल्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली…तसा अर्ज नगर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवत फुटेज द्यायला साफ नाकारलं… आरोप प्रत्यारोप होत राहिले… पण प्रकरण शांत झालं होतं… या सगळ्यात अचानक मोठा बॉम्ब पडला… आणि तो टाकला मतदानात अवघी 937 मत पडलेल्या हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी…

तर प्रकरण असं होतं की ईव्हीएम मशीन आणि पोस्टल बॅलेट मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपीचा वापर करण्यात येतो… त्यामुळे मतदान मोजणीच्या ठिकाणी फक्त निवडणूक कर्मचाऱ्यांनाच मोबाईल फोन वापरण्याची परवानगी असते… आता याच निस्को गार्डनवर मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे इनकोर ऑपरेटर दिनेश गुरव याच कामासाठी मोबाईल फोन वापरत होते…पण याच दरम्यान मतमोजणी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांनी दिनेश गुरव यांच्याकडचा ईव्हीएम अनलॉक करण्याचा फोन आपल्याकडे घेत कुणालातरी कॉल केल्याचा आरोप भरत शाह यांच्याकडून करण्यात आला.. आणि यानंतर पुन्हा एकदा मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाच्या गोंधळाचा रान उठलं…

या सगळ्या प्रकारावर पोलिसांनी आपली बाजू मीडियासमोर मांडली ते म्हणाले, आरोपी मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना सीआरपीसी ‘41 अ’ अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. पंडीलकरचा मोबाईल ४ जूनलाच जप्त करण्यात आला होता. तसंच त्यानं त्या मोबाईलवरून नेमकं काय केलं हे चेक करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलाय…आता या सगळ्या घटनाक्रमामुळे काही प्रश्न स्वाभाविकपणे विचारले जाऊ शकतात.. त्यातला पहिला म्हणजे पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता? एवढी मोठी सिक्युरिटी असतानाही त्याला निवडणूक कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोन दिलाच कसा? एन्ट्री पॉईंट्स, स्ट्राँग रुम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमक्या कोणत्या संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्या?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यथावकाश मिळतीलच…पण या प्रकरणामुळे निवडणूक घेण्याच्या आयोगाच्या संपूर्ण सिस्टीमवरच भलं मोठ प्रश्नचिन्ह उपस्थित झालय… आदित्य ठाकरेंनीही या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत नाही, यातून आयोगाचा सुद्धा यात सहभाग असल्याचे दिसून येतय… चंडीगड प्रकरणात आयोगाची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून सीसीटीव्ही फुटेज देण्यात टाळाटाळ करण्यात येतेय, असा आरोप त्यांनी लगावला… हे कमी होतं की काय म्हणून रवींद्र वायकर यांच्या या ईव्हीएम घोटाळ्यासंबंधीच्या एका बातमीचं कात्रण ट्वीट करत राहुल गांधींनीही हा प्रकार धक्कादायक असल्याचं स्पष्ट केलं…EVM हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे… त्याची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतच यामुळे गंभीर चिंता व्यक्त करता येऊ शकते… असं म्हणून राहुल गांधींनी ईव्हीएम मध्ये काहीतरी छेडछाड केली गेलीय… या होत असलेल्या आरोपांना दुजोरा दिलाय…नेमकं उत्तर पश्चिम मधून कोण जिंकलय? मोबाईल डिव्हाईस चा वापर करून निकालात काही फेरफार करण्यात आला का? हे तपासानंतर समोर येईलच…पण मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालामुळे… रवींद्र वायकरांच्या खासदारकीमुळे… पोलीस प्रशासनापासून ते थेट निवडणूक आयोगापर्यंत सगळेजण अडचणीत आलेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.