हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की पहिला शब्द सतत कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. (Code of conduct) कोणत्याही राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या की, त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीच्या उमेदवारांना देखील बंधनकारक असते. चुकून जर कोणत्या उमेदवाराने किंवा पक्षाने या आचारसंहितेचे नियम मोडले तर त्यावर कारवाई केली जाते. परंतु ही आचारसंहिता नेमकी कधी लागू होते? ती किती काळ राहते? या काळामध्ये कोणते नियम पाळावे लागतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मतदान करणाऱ्या नागरिकांनाच माहीत नसतात. त्यामुळेच आजच्या या लेखात आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
1) आचारसंहिता केव्हा पासून लागू होते?
निवडणूक आयोग कोणत्याही निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी सुरुवातीला एक पत्रकार परिषद घेते. त्यावेळी या तारखा जाहीर करतानाच तात्काळ परिणामाने आदर्श आचारसंहिता लागू होते, ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत
लागू च राहते.
2) आचारसंहिता कोणत्या भागात लागू करण्यात येते?
संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी आचारसंहिता लागू असते परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी फक्त त्या त्या राज्यांमध्येच आचारसंहिता लागू असते. तर पोटनिवडणुकी वेळी आचारसंहिता संबंधित मतदारांच्या परिसरात लागू असते.
3) पहिल्यांदा आचारसंहिता कुठे लागू करण्यात आली होती?
1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीवेळी पहिली आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1962 साली लोकसभेच्या निवडणुकीवेळी देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली.
4) आचारसंहिता कोणत्या कायद्यांतर्गत लागू असते?
आदर्श आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेत नाही. ही आचारसंहिता सर्व राजकीय पक्षांचे मत आणि तज्ञांचे मत घेऊन लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये वेळोवेळी बदलही करण्यात येत आहे.
5) आचारसंहितेची वैशिष्ट्ये कोणती?
आचारसंहितेमध्ये राजकीय पक्षांसाठी उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे नियम आखून दिले आहेत. प्रामुख्याने राजकीय पक्ष, उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी सभा प्रचार निवडणुका मिरवणुका यांचे नियोजन कसे करावे याबाबतची नियमावली आचारसंहिते देण्यात आली आहे. तसेच या काळामध्ये कशा पद्धतीने वागायला हवे हे देखील सांगण्यात आले आहे.
6) आचार संहितेत पक्ष आणि उमेदवारांसाठी कोणते नियम आहेत?
समाजामध्ये द्वेष पसरवू नये, वाद होईल असे कोणतेही वक्तव्य करू नये, जाती आणि समुदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये, हिंसक किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये.
7) आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई होते?
एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने आचारसंहितेचे नियम पाळले नाहीत तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कठोर कारवाई करते. यावेळी संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून थांबवले जाते. गरज असल्यास फौजदारी खटलाही दाखल केला जातो. अधिक नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची ही शिक्षा होते.