भारताचे माजी राष्ट्रपती, महान संशोधक, भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ‘वाचन’ याविषयी लिहितं केलं. आपल्या आयुष्यात वाचनाचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरुणाईने केला. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत त्यांची ही धडपड पोहचवत आहोत.
वाचनानं मला निसर्गाशी जोडलंय – पल्लवी साळुंखे
अथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस्कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी सगळं काही गमावूनही खंबीरपणे उभ राहण्याचं बळ वाचनाच्या संचितामुळे मिळतं. एक डोळस विवेक ज्याचं सामर्थ्य वाचनामुळे मनाला प्राप्त होत. बुद्धिमत्ता वाचनाने तीक्ष्ण होते . विचार करण्याची क्षमता वाढते तसच एक विशाल दृष्टिकोन लाभतो. नवीन गोष्टी आत्मसात करण्याची आणि एकाग्रता मनाची वाचनामुळे साधते. जरी आजच्या काळातील पिढी वाचन, पुस्तक आणि ग्रंथालय विसरत चाललीय. पण हे सत्य पुस्तकाच्या सहवासात आल्यावर खूप छान उमगत की वाचन व्यक्तीच चरित्र घडवण्यात खूप मोठी भूमिका बजावत.
चौफेर वाचन आणि त्याच उपयोजन हे जीवनाचा अर्थ उन्नत आणि समृद्ध करत. कविता, ललित, कथा, कादंबरी, लघुलेख, प्रवासवर्णन , नाटक, रहस्यकथा, तसाच कितीतरी साहित्याचे प्रकार मानवी स्वभावाचे आणि मानवी जीवनाचे विविध पैलू मांडतात. जीवनाला सोबत जर अखंडपणे कोण करत असेल ते साहित्य. जिथं साहित्य संपत तिथं राष्ट्र संपतं. आणि मानवाच हे जीवन कायम अर्थपूर्ण ठेवायच असेल तर वाचन आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती महत्वाची आहे. वाचनाने मला काय दिल असेल तर नितीमूल्य, विवेक, कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला मला शिकवलं. वाचन हा माझा असा सोबती आहे की जो दर क्षणी मला काहीतरी नवीन देतो. माझ्या विचारांच्या आणि दृष्टिकोणाच्या आणि कल्पनाशक्तीच्या मिती वृद्धिंगत करतो. जो मला कधीही हरू देत नाही. जो लढण्यासाठो मला नेहमी बळ देतो. मला निसर्गाशी जोडलंय.
मानवी स्वभाव आणि जीवन यांचा शोध घेण तसच जीवनाला एक सुरेल गीत वाचनाने केलंय. गुणगुणतात क्षण माझे जेव्हा वाचन सोबत असत. वाचनाने दृष्टी दिलीय न्याय आणि निसर्गातील जीवनाचे विविध रंग पाहण्याची, चिकित्सा करण्याची. वाचनाने आनंद दिलाय इतका नितळ आणि निर्मळ जो इतर कशातही मला मिळत नाही. ज्ञानाच्या अथांग खोली शोधताना मला एक जिज्ञासू बनवलाय वाचनाने . प्रचंद वेडी आहे मी पुस्तकांसाठी. वाचन ज्याने मला जीवनच गीत गायला शिकवलं, वाचन ज्याने मला दुसऱ्याचा विचार करायला शिकवला. वाचनाने एक चांगला माणूस होण्यास सांगितलं. असंख्य वादळात सामोरं जायला आणि जिंकायला शिकवलं. इतिहासाच्या पानातून मानवी हिम्मत ,शौर्य आणि वेळेची कहाणी मिळाली. आणि एक वेड करणार समृद्ध गीत मला वाचनाने दिल. जे मी ऐकू शकते.
पुस्तकं दुसऱ्याची इज्जत करायला शिकवतात – अजित पांढरे
पुस्तके वाचून नव नवीन विचार सुचतात आपण न पाहलेली स्वप्न आपण पाहू लागतो. आपणास देखील त्यांच्यासारखे व्हावे वाटू लागते (पुस्तकात असलेली व्यक्ती) आपले विचार बदलतात. आपण कसे success मिळवू शकतो याच्याकडे आपण जास्त लक्ष देत जातो. आपले वागणे शिस्तीचे बनते. आपण करत असलेल्या चुका आपणास लक्षात येतात व आपण योग्य दिशेने वाटचाल करू लागतो. आपण दुसऱ्याची इज्जत करू लागतो. एकूणच पुस्तके वाचून आपले जीवनच बदलते. तसेच हे लक्षात येते की आयुष्य किती अडचणीचे आहे. पण नकळत पुस्तकं वाचल्याने त्या अडचणींवर मात कण्यास आपण सक्षम होतो. या जगात सन्मानानेजगण्यासाठी वाचनच ती चावी आहे, जी आयुष्य जगताना नेहमी उपयोगी पडेल आणि जीवन कसे जगायचे हे शिकवेल.
चांगला निर्णय घेताना वाचनाची मदत होते – दीक्षा कुंभार
पुस्तक वाचून माणसांच्या विचारांचा जन्म होतो. आपण जेव्हा मोठ-मोठया लेखकांची पुस्तके वाचत असतो तेव्हा आपण त्या पुस्तकातील एक व्यक्ती म्हणुन जगत असतो. त्या पुस्तकातील ती व्यक्ती आपणच आहोत असं आपल्याला वाटायला लागत. मग आपल्याला असं वाटतं की आपणही त्यांच्यासारखं झालं पाहिजे. मग त्यांच्या विचाराप्रमाणे आणि सवयीप्रमाणे आपण वागायला लागतो. आणि मग आपल्यातला नवीन माणूस जन्म घेतो.
सतत वाचन केल्याने आपले विचार बदलतात, विचारांची उंची वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते.
आपल्या ज्ञानात भर पडतेच पण समाजात कस वावरायच हेही समजतं. थोरा-मोठंयाचा आदर करायला शिकतो. वाचनातील विचारांमुळे अनेक कल्पना सुचायला सुरूवात होते. वाचन ही अशी कला आहे की आपल्या भावना व्यक्त होतात आपले विचार आपण मांडायला लागतो. एखादा निर्णय घेताना आपण त्या गोष्टीचा सारासार विचार करतो आणि यामुळे आपल्या जवळ असणाऱ्या positive waves चा उपयोग वाचनामुळे होतो.