सातारा | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेतल्या व्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिले आहे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. राज्य शासनाला भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे ? घटनेने सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलेले आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर आपण स्वतः प्रसंगी गुन्हा दाखल करू असा थेट इशारा उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांची याबाबत संवाद साधला येत्या 21 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही सारे भारतीय अशी राज्यव्यापी यात्रा आरंभ करत असल्याचे लक्ष्मण माने यांनी सांगितले. त्याची सुरुवात ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माने पुढे म्हणाले, ज्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे त्यांना माझे ओपन चॅलेंज आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांना फसविण्याचा धंदा बंद करावा. हिंदुराष्ट्राचा गळा काढणारे मूठभर लोक आहेत. अस्पृश्य भटके, अल्पसंख्यांक ख्रिश्चन, यहुदी, लिंगायत, जैन इत्यादी अल्पसंख्यांक जातींना हिंदू राष्ट्र हवे आहे का ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जातींचा अभ्यास करून त्यांचा समन्वय साधणारे भारतीय संविधान तयार केले असून ते सर्वोच्च आहे. त्या संविधानावर आक्रमण करून भाजपने देशात व राज्यात धुडगूस घातला आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
आम्ही भारतीय लोक हे अभियान महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवणार असल्याचे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले. या उपोषणाला आपण सर्व भारतीयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानाची सुरुवात दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून करणार आहे. या चळवळीमध्ये माझ्यावर हल्ला झाला तरी चालेल पण कोणी तरी या बेबंदशाही ला विरोध करायला हवा म्हणून मी या संघर्षात उतरत असल्याचे माने यांनी सांगितले.