टीम हॅलो महाराष्ट्र। आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचा वाद आता छत्रपतींचे खरे वंशज कोण? याबाबत पुरावा मागण्यापर्यंत गेला आहे. या पुस्तकाविषयी शिवसेनेनं भाजपवर टीका करताना छत्रपतींचे वंशजांना शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्याबद्दल भूमिका मांडावी अशी विचारणा केली होती. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांचे तिन्ही वंशज भाजपमध्ये असणे होय. शिवसनेच्या प्रश्नाला प्रतिउत्तर देत सर्वात आधी उदयनराजे राजे समोर आले.
शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? असं म्हणत शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिला होता. उदयनराजेंच्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजपाचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील उडी घेत राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
”आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव” असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच वाद सुरु केला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा असं शिवेंद्रराजेंनी सांगितले. दरम्यान राऊत यांच्या उदयनराजेंना पुरावा मागण्याच्या विधानाने नव्या वादाला तोंड फोडलं आहे.