हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक वर्षांपूर्वी, “धरणात पाणी नाही तर त्यात मुतू का”असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या चुकीची कबुली देत आता मी दहा वेळा विचार करून बोलतो असे म्हटले होते. परंतु, आता पुन्हा एकदा नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांची जीभ घसरल्याचे दिसत आहे. कारण अजित पवारांनी थेट PHDकरणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात मोठे वक्तव्यं केले आहे. या वक्तव्यामुळे अजित पवारांना पुन्हा टीकेचा सामना करावा लागत आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत? त्यांनी या केलेल्या वक्तव्यामुळेच अनेकांना आश्चर्य वाटले आहे. तसेच, अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याचा पीएचडी विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील अजित पवारांना ट्रोल करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी हिवाळी अधिवेशनामध्ये सारथीसारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने सुविधा पुरवल्या जातील यावर चर्चा करण्यात आली. पुढे या संदर्भात बोलताना सतेज पाटील म्हणाले की, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी.” यानंतर सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीवर प्रश्न उपस्थित करत अजित पवार म्हणाले की, फेलोशिप घेऊन ते काय करणार आहेत?, यावर पुन्हा उत्तर देत पाटील म्हणाले की, “हे विद्यार्थी पीएचडी घेतील.” याला प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले, “पीएचडी करून काय दिवा लावणार आहेत?” अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.