हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हवामान बदलाच्या प्रादुर्भावामुळे भारतातील गहू आणि तांदळाच्या उत्पादनात ६ ते १० टक्के घट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढतील आणि अन्नधान्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल. महत्वाचे म्हणजे, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन यांनी सांगितले की, हिमालयीन भागांतील पाण्याचा स्रोत असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सेस कमी झाल्याने भविष्यात अब्जावधी लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.
हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्र यांच्या मते, हवामान बदलाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर देशाच्या अन्नसुरक्षेलाही बसण्याची शक्यता आहे. भारतीय लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. तर ८० टक्के लोक सरकारी अन्नधान्य योजनेवर अवलंबून आहेत. त्यामुळे हवामान बदलाचा शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांवर परिणाम होणार आहे.
दरम्यान, नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रिसायलेंट ॲग्रिकल्चरच्या अंदाजानुसार, २१०० पर्यंत गव्हाच्या उत्पादनात ६ ते २५ टक्क्यांनी घट होऊ शकते, तर २०८० पर्यंत तांदळाचे उत्पादन १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. देशात सध्या गहू आणि तांदळाचे उत्पादन अनुक्रमे ११३.२९ दशलक्ष टन व १३७ दशलक्ष टन आहे, पण भविष्यात त्यात मोठी घट होऊ शकते.