कराड | येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाच्या कामामुळे लावलेल्या बॅरिगेट्समूळे सर्व्हिस रोडवर एकेरी वाहतूक सूरू आहे. या रोडने जाताना एका दुचाकी चालकाचा चालणाऱ्या महिलेस धक्का लागल्याने ती रस्त्यावर पडली. यावेळी महिलेच्या हातावरून एसटीचे चाक गेले. यात ती महिला गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हापूर नाक्यावर बोराटे पंपानजीक ही घटना घडली. शारदा बाळकृष्ण पाटोळे (वय 52, रा. जूळेवाडी ता. कराड) असे जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कोल्हापूर नाक्यावरून मलकापूरच्या दिशेने डाव्या बाजूने चालत निघाली होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वराचा सदर महिलेस धक्का लागल्याने ती महिला रस्त्यावर पडली. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या एसटी बसचे पुढील चाक त्या महिलेच्या हातावरून गेल्याने महिला गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ परिसरातील नागरिकांनी कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी घटनास्थळावर पोलीस, वाहतूक पोलीस व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पूल पडण्याच्या कामामुळे सध्या पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होऊ लागला आहे. मात्र, अद्यापही काही उत्साही वाहन चालक चुकीच्या दिशेने प्रवास करत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा होत आहे. याशिवाय मलकापूर पूलास ही बॅरिगेटस लावण्यास सूरूवात केल्याने त्या परिसरात ही वाहतूक संथगतीने सूरू आहे. कोल्हापूर नाका परिसरात संपूर्ण उड्डाणपुलाला लावण्यात आलेल्या बॅरिगेट्समुळे महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. परिणामी, याठिकाणी वाहतूक मंद गतीने सुरू आहे. वाहनांच्या रांगा लांबच लांब लागत आहेत.