मुंबई | मुलाखतीत उध्दव ठाकरे यांनी अतिशय दुर्देवी वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वापरलेली आहेत. 2019 साली उध्दव ठाकरेंनी सांगितले होते की, मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेंन. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे ठरले असताना. शेवटच्या एक-दोन दिवसात अशी कुठली कांडी फिरली की, स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता ते सांगत आहेत, विचारले होते. एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य निराधार असून अशी कुठल्याही पध्दतीची विचारणा झालेली नव्हती, असे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार व माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
आमदार शंभूराज देसाई मुंबईत एका खासगी वृत्तवाहिनींशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, आमची 40 जणांची भूमिका गटनेते एकनाथ शिंदे यांनी किमान 5 ते 10 वेळा त्यावेळेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातली होती. आमदारांची अडचण होत आहे, आमदारांना तोंड दाबून बुक्याचा मार खावा लागत होता, तेव्हा आपण निर्णय घ्या. परंतु अडीच वर्षात कुठलाही निर्णय उध्दव ठाकरे यांनी घेतला नाही. एका बाजूला चर्चा करायला पाठविले अन् एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून काढायचे. आम्ही स्व. बाळासाहेबांची शिवसेना वाचविली. महाविकास आघाडीत विशेषकरून राष्ट्रवादीकडून शिवसेना पोकरण्याचे काम सुरू होते. ते रोखले, थांबविले. अशावेळी आम्ही शिवसेना वाचविण्याचे काम केले आहे. सामान्य शिवसैनिकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम आम्ही केले.
विश्वाघातकी, पालापाचोळा आणि गद्दार हे शब्द केवळ नैराश्यपोटी
तुम्ही आम्हांला काल पालापाचोळा म्हणाला, आज विश्वासघातकी म्हणाला. परंतु गेली अडीच वर्ष आम्हांला सोबत घेवूनच महाविकास आघाडी सरकार चालवले. त्यावेळी आम्ही 51 जण चाललो आणि आज आम्ही हिंदुत्वाचे, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेवून निघालो आहोत. त्याला आपण विश्वासघात म्हणत आहात. स्व. ठाकरे म्हणाले होते, कदापी मी काॅंग्रेस सोबत जाणार नाही. ज्यांनी मुंबईत बाॅम्बस्फोट केले, मुंबईतील लोकांचे बळी घेतले. दाऊदशी थेट संबध असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत तुम्ही आम्हांला मांडीला मांडी लावून बसायला लावले. तेव्हा ही भूमिका तुम्ही स्व. ठाकरे यांच्या भूमिकेच्या विसंगत भूमिका घेतली, त्याला नेमंक काय म्हणायचे. तेव्हा विश्वाघातकी, पालापाचोळा आणि गद्दार हे शब्द उध्दव ठाकरे केवळ आता नैराश्यपोटी बोलत आहेत, असा थेट हल्लाबोल आ. शंभूराज देसाई यांनी केला.
आमच्या भूमिकेला लाखो शिवसैनिकांचा पाठिंबा
एकनाथ शिंदे यांनी कधी बाळासाहेब ठाकरे कि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत तुलना केली नाही. अशी वाक्ये केवळ एकनाथ शिंदे यांच्याबद्दल समाजात मतभेद करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांना आम्ही घेतलेली भूमिका पटलेली आहे. ज्वलंत हिदुत्वाचा आम्ही महाराष्ट्रात घेवून जावू तेव्हा सामान्य लोकांचे लोढ्याचे लोढे तुम्हांला पाठबळ देताना दिसतील. संपादक संजय राऊत यांचेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तरे अशी ही मुलाखत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले तसे ही सर्व मुलाखत मॅचफिक्सिंग आहे. त्यामुळे याकडे फारसं गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेवून जात आहोत.