औरंगाबाद – कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी, जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरने तब्बल ९० हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. अनिल विष्णू सावंत असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांत सरकारी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाच घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिकी सल्लागार असून त्यांचेकडे आलेल्या पक्षकार यांचे कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी, जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही असे बघून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी या अगोदर 45 हजार रुपये घेतल्याचे मान्य करून 90 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यांच्या सोबत असलेला त्यांचा भाऊ नामे सचिन सावंत यांचेकडे देण्याचे सांगितले. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक मारुती पंडित, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश धोक्रट, पो.ना.सुनील पाटील, पो.ना.दिगंबर पाठक,पो.अं.विलास चव्हाण, चालक चांगदेव बागुल यांनी पार पडली.