हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काहीही झालं तरी आमचं ठरलंय. सांगली आणि विशाल पाटील (Vishal Patil) हे समीकरण फिक्स झालंय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पब्लिक डोमेनमध्ये दिलेला हा शब्द. पृथ्वीराज चव्हाणांनीही विशाल पाटलांच्या उमेदवारीवर केव्हाचा शिक्कामोर्तब केलेला. यंदा गुलाल फिक्स असल्यानं विशाल पाटीलही वर्षभरापासून सांगलीत तळ ठोकून होते. शेवटी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक बसली. अन् यात बळी देण्यात आला तो सांगलीच्या विशाल पाटलांचा. ठाकरेंनी सांगलीच्या जागेचा हट्ट धरला. आणि तो पूर्ण झालादेखील. नाराज विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी हायकमांडवर प्रेशर टाकूनही त्यांचे सगळे प्रयत्न फेल झाल्याचं दिसतंय. पण ही सगळी क्रोनोलॉजी नीट समजून घेतली तर, पाटील घराण्याच्या रुपानं काँग्रेसचं मोठं प्रस्थ असताना, विशाल पाटलांचे खासदारकीला जिंकून येण्याचे चान्सेस असताना त्यांचा बळी कुणी आणि नेमका का दिला? पाटील घराण्याचंं जिल्ह्यातील राजकारण संपवण्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्यांचा हात आहे का? विशाल पाटलांची नाकारलेली उमेदवारी म्हणजे पाटील घराण्याचा राजकारणातील दी एण्ड आहे का? याच काहीशा इंटरेस्टिंग मात्र तितक्याच कडवट राजकारणाची ओळख करुन देणाऱ्या सांगलीच्या तिढ्याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊयात ..
एकेकाळी काँग्रेसची सगळी तिकीटं वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतून (Sangli Lok Sabha) ठरवली जायची. वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, मदन पाटील, प्रकाशदादा पाटील आणि प्रतिक पाटील अशा दादा घराण्याने १९८० पासून २०१४ पर्यंत सांगली आपल्या ताब्यात ठेवली. त्यामुळे सांगली म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पाटील घराणं.. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. मात्र दिवस बदलले आणि पाटील घराण्यातील चक्र फिरु लागली. २०१४ मध्ये स्टॅडिंग खासदार प्रतिक पाटील हे काँग्रेसकडून सांगलीच्या लढतीत होते. मात्र भाजपकडून मैदानात असणाऱ्या संजय काका पाटलांनी लीड घेत पाटील घराण्याला पराभवाची धूळ चारत इतिहास रचला. पुढे प्रतिक पाटील यांनी वसंतदादांच्या स्मृतीस्थळावरुन राजकारणाचा संन्यास घेतला. प्रतिक पाटलांच्या नेतृत्वहिन आणि संथ राजकारणामुळे या निर्णयानं सांगलीच्या राजकारणावर फारसा परिणाम काही घडला नाही. पण याचठिकाणी प्रतिक पाटलांचे छोटे बंधू विशाल पाटील यांनी लोकसभा लढण्याचा निर्धार बोलावून दाखवला. आणि जिल्ह्यातील पाटील घराण्यालाा राजकारणातील नवा चेहरा मिळाला. २०१९ च्या लोकसभेला तिकीट वाटपात काड्या करुन काँग्रेसच्या हक्काची ही जागा स्वाभिमानीला सोडण्यात आली. काहीही केलं तरी लोकसभेचा निर्धार केलेल्या विशाल पाटलांंनी अवमूल्यन स्विकारुन स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र गोपिचंद पडळकरांमुळे वंचित फॅक्टर आडवा आल्याने विशाल पाटील निवडणुक हारले. जर वंचितनं मत घेतली नसती तर पाटलांचा नातू खासदार झाला असता…
कट टू २०२४. एकदा पराभवाचा चटका बसल्यानं विशाल पाटलांनी आधीच सांगली पिंजून काढली होती. पाटलांची यंत्रणा मतदारसंघात अनेक महिन्यांपासून सक्रीय झाली. पटोलेंपासून, पृथ्विराज चव्हाणांसारख्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सांगली काही केल्या विशाल पाटलांचीच.. हे क्लिअर कट बोलून देखील. तिकीट वाटपाच्या तोंडावर यात मीठाचा खडा पडला. आणि काँग्रेसचं ग्राऊंड नेटवर्क तगड्या असणाऱ्या या जागेवर चंद्रहार पाटलांसारख्या नवख्या उमेदवाराला ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं. सांगलीची विशाल पाटलांची दावेदारी मजबूत असताना त्यांचाच पुन्हा गेम झाला. विश्वजित कदमांच्या मदतीने विशाल पाटील दिल्लीपर्यंत फिल्डींग लावतायत..पण सांगलीच्या या पाटील घराण्याचा खरा गेम हा काँग्रेस – राष्ट्रवादीकडून होतोय असाही एक अँगल या सगळ्या क्रोनाॅलोजीला असल्याचं दिसतं…
त्यातलं पहिलंं कारण ठरतं ती म्हणजे जयंत पाटलांची अदृश्य शक्ती…
सांगलीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील गट तर काँग्रेसकडून विशाल पाटील आणि विश्वजित कदम गट एक्टिव्ह आहे. सांगलीत राष्ट्रवादीला हातपाय पसरण्याला मर्यादा येतात त्या अर्थातच काँग्रेसच्या पाटील घराण्यामुळे. काहीही झालं तरी पाटील घराण्याचा सांगलीतील प्रभाव कमी करायचा होता. २०१९ च्या लोकसभेच्या निम्मिताने ही संधी पाटील विरोधकांना चालून आली. सांंगलीतून विशाल पाटील निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र तिकीटवाटपाचं गणित जुळवून घेताना आघाडीसोबत आलेल्या स्वाभिमानीला दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात हातकणंगले आणि रविकांत तुपकरांच्या रुपानं बुलढाण्याच्या जागेवर जवळपास शिक्कामोर्तब झाला. पण बुलढाण्यात तुपकर जिंकले तर पुन्हा पॉवर पॉलिटीक्स इनबॅलन्स होईल यासाठी शेट्टींनी बुलढाण्यााचा हट्ट धरला नाही. याचवेळेस राष्ट्रवादीकडून प्रस्ताव समोर करण्यात आला तो म्हणजे सांगलीचा… खरंतर काँग्रेसचा प्रभावक्षेत्रात येत असल्यानं हा कॉल काँग्रेसनं देणं अपेक्षित होतं. मात्र राष्ट्रवादी्च्या नेत्यांनी खेळी करत सांगली स्वाभिमानीला जाऊ दिली. काँग्रेसचे हात दगडाखाली सापडले होतेे. शेवटी विशाल पाटलांनी आघाडीला सुटलेल्या या सांगलीमधून स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणुक लढवली. मात्र पडळकर फॅक्टर चालल्यामुळे विशाल पाटलांसाठी मैदान थोड्यासाठी हुकलं.
कट टू २०२४. कोल्हापुरच्या जाागेवरुन विशाल पाटलांच्या उमेदवारीचा वाद सुरु झाला. शाहु छत्रपतींना कोल्हापुरातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील, असं बोललं गेलं. तस पाहायला गेलं तर या जागेवरचा स्टँडिंग खासदार शिंदे गटाकडे गेल्यानं ही ठाकरे गटाला ही जागा सुटणं अपेक्षित होतं. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटातून सूत्र हालली अन् ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. त्यामुळे ठाकरेंनी कोल्हापुरच्या बदल्यात सांगली हा सूर आळवला. खरंतर सांगलीत शिवसेनेची फारशी ताकद नसतानाही त्यांनी हा डाव राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरुन टाकला का? असंही बोलायला स्कोप मिळतो. थोडक्यात काय तर दादा पाटील घराणं आणि शरद पवार यांचं जे काही ऐतिहासिक वैर आहे. त्याला सांगलीच्या निम्मित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून बळ मिळत असल्याची चर्चा मतदारसंघात आहेत.
दुसरं कारण येतं ते म्हणजे विश्वजित कदमांचे पंख छाटण्याासाठी विशाल पाटलांचा बळी
विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मात्र, आता आमची हौस भागली आहे. आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे ‘विश्वजित’ पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, असं सांगून विशाल पाटलांनी आता सब कुछ विश्वजित असल्याचं क्लिअर केलं. तसा फारसा संबंध नसतानाही राऊतांनी विशाल पाटलांचे पायलट गुजरात मध्ये लँट करु नयेत म्हणजे झालं, असं बोलून विश्वजित कदमांच्या भाजपात जाण्याच्या चर्चांना तोंड फोडलं. विशाल पाटलांची सांगलीची उमेदवारी नाकारल्यानतर त्यांना पुन्हा उमेदारी मिळवून देण्यासाठी विश्वजित कदमांनी स्टेअरिंग हातात घेतलंय. दिल्लीतील हायकमांडच्या भेटी घेण्यापासून ते राऊतांना तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायलाही कदमांनी कमी केलं नाही. सांगलीच्या जागेसाठी कदम आक्रमक झालेले असताना दुसरीकडे नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण मात्र सांगलीसाठी थंडे पडले होते. इतकंच काय तर नाना पटोलेंना परिस्थिती माहित असतानाही हायकमांडच्या आदेशाच सगळे पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यांचं समाधान आम्ही करु, असं बोलून त्यांनी विषयावर पडदा टाकलाय. यातून विश्वजित कदमांची काँग्रेसमध्ये उभ्या राहू पाहणाऱ्या लीडरशिपला राज्यातीलच पक्षातील नेते शह देण्यासाठी हा डाव टाकतायत का, अशीही चर्चा केली जातेय. विशाल पाटील यांचं भाषणकौशल्य, नेतृत्वाची क्षमता ही पुऱ्या सांगलीला ठाऊक आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे समीकरण पक्षात वाजलं तर काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेत्यांना अर्थातच ही धोक्याची घंटा ठरु शकते. त्यामुळे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाचे पंख छाटण्याच्या नादात विशाल पाटलांचा बळी पक्षाकडूनच दिला जातोय का, अशीही शंका निर्माण होणं रा्स्त आहे…
तिसरा आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे शिवसेनेला काय सिद्ध करायंचय?
शिवसेनेनं कोल्हापुरच्या बदल्यात सांगली मागितली. पण तसं पाहायला गेलं तर सांगलीत शिवसेनेपेक्षा काँग्रेस स्ट्राँग आहे. त्यात चंद्रहार पाटलांसारखा राजकारणाचा कुठलाही बॅकअप किंवा अनुभव नसणाऱ्या चेहऱ्यासाठी ठाकरेंनी इतका खटाटोप का केला हा मोठा प्रश्न आहे. त्यात ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील हे अनेकदा जयंत पाटील यांच्यासोबत नकळत कॅमेऱ्यामध्येही टिपले गेले. मात्र या भेटी का आणि कशासाठी झाल्या हा ही मोठा प्रश्नच आहे.
ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून यायचं असेल तर दादा पाटील घराण्याचा सपोर्ट चंद्रहार पाटलांच्या पाठिशी असणं ,महत्वाचं आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी असताना ठाकरेंना ही जागा जड जाणारी आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेची ठाकरे गटाकडून वाजवली जाणारी ही स्क्रीप्ट मविआतीलच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने लिहीली होती का? हे प्रश्नचिन्हंही आणखी गडद होतं…येत्या काळात नाराज विशाल पाटील काय निर्णय घेणार तो राजकारणाचा मुद्दा… पण काँग्रेस पक्षाचा विश्वजित कदम – विशाल पाटील जोडगोळीला असणारा अंतर्गत विरोध, नाना पटोले, पृथ्विराज चव्हाण यांसारख्या नेत्यांची सायलंट भूमिका, राष्ट्रवादीनं आतून दादा पाटलांच्या घराण्याला चालवलेला विरोध आणि शिवसेनेच्या खांद्यावरुन कुणीतरी पाटील घराण्यावर धरलेला नेम या सगळ्यांचा परिपाक म्हणूनच विशाल पाटलांच्या उमेदवारीचा बळी गेला, असं म्हणायला स्कोप उरतो. अजून पाच वर्ष राजकारणापासून लांब राहावं लागणार असल्याने विशाल पाटलांची उमेदवारी नाकारून एकप्रकारे पाटील घराण्याला राजकारणातून संपवण्याच्या नाटकामधला हा पहिला अंक तर नव्हता ना? असाही प्रश्न निर्माण होतोय.