सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. जिल्ह्यातील कोरोना काळात जिल्हाधिकारी सिह यांनी केलेल्या कामावरून व घेतलेल्या निर्णयावरून भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्ह्यातील कोरोना काळातील अस्तित्वाबाबत शंका उपस्थित करीत त्यांना टोला लगावला आहे. “या जिल्ह्यात पालकमंत्री कोण आहे हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिह हेच आहेत असे वाटते. त्यामुळे पालकमंत्र्यांचे कोरोना काळातील अस्तित्व हे किती आहे हे माहिती नाही,” असे गोरे यांनी म्हंटले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलनाची केली जात असलेली तयारीबाबतची माहिती सोमवारी आमदार जयकुमार गोरे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्यावर टीका केली.
यावेळी गोरे म्हणाले, या जिल्ह्यात कोरोना काळात काम करीत असताना शेखर सिह यांनी मनमानी पद्धतीने काम केले आहे. कोरोना काळात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील डॉक्टर, तज्ञांना विश्वासात घेऊन त्यांची मदत घेण्याची गरज होती. मात्र तसे त्यांनी केले नाही. त्यांनी स्वतःच सर्व निर्णय घेतले. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो कि होम आयसुलेशनचा निर्णय रद्द करून ते बंद करावे. मात्र, आमच्या मागणीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले गेले. त्याचा परिणाम असा झाला कि अनेक रुग्ण घरातच गंभीर झाले. परिणामी रुग्णांचे प्रमाण वाढले. आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन लावताना व कोरोनाबद्दलचे निर्णय घेताना कधी पालकमंत्र्यांशी चर्चा केल्याचे पहायला मिळालेले नाही.