गतीमंद महिलेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड; कॅफेचालकामुळे प्रकरण आले समोर

औरंगाबाद : शहरातील सिडको परिसरातील सतर्क कॅफेचालकामुळे गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीसांनी अटक केली आहे. आकाश उर्फ टोग्या भगवान तुपे (वय.२१, रा.एन.७ सिडको) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या फरार आरोपीचा पोलीसांकडून शोध सुरु आहे. कॅफेचालक त्याच्याकडील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्याला हा धक्कादायक प्रकार दिसला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत २४ तासांत एका आरोपीला जेरबंद केले आहे.

सिडको एन-७ येथील व्यापारी संकुल येथील कॅफेचालक त्याच्या कॅफेसमोरील सिसिटिव्ही फुटेज बघत असताना त्याला रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास या गतिमंद महिलेवर दुकानासमोर दोघे अत्याचार करत असल्याचे दिसले. त्याने याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना दिली.

फुटेज पाहिल्यावर गिरी, उपनिरीक्षक प्रतिभा आबुज यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्यांसोबत तपास केला. तपासात २० जून रोजीही तिच्यावर अत्याचार झाल्याचे आढळले. सिडको भागात फिरणाऱ्या मवाल्यांनी हा विकृत प्रकार केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत आरोपी आकाशला अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. सदरील महिला तक्रार देऊ शकत नसल्याने कॅफेचालकाची तक्रार ग्राह्य धरून गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.