हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती (Baramati) म्हणजे पवार… आणि पवार म्हणजे बारामती…. यामुळेच राष्ट्रवादीत जेव्हा फूट पडली तेव्हा बारामती कुणाची? हा पेच सर्वांनाच पडला… त्याचा पहिला निकाल लोकसभेच्या निमित्ताने लागणार आहे… 4 जूनला जो उमेदवार जिंकेल त्याला आणि पर्यायानं त्यांच्या पक्षाला बारामतीवर क्लेम करणं तूलनेनं सोपं जाऊ शकतं… पण यानंतर खरा प्रश्न येतो तो बारामती विधानसभेचा… शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजूने सहानुभूतीची लाट असली तरी देखील बारामती विधानसभेत फक्त आणि फक्त अजितदादांचा शब्द चालतो… सहकारी साखर कारखान्यांपासून ते शिक्षण संस्था, सहकारी बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरही दादांचा कमालीचा होल्ड आहे… ‘दादा म्हणतील ती पूर्व दिशा’ या न्यायानं काम करणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी बारामतीत अजितदादांनी (Ajit Pawar)पेरली आहे. त्यामुळे लोकसभा तर झाली पण विधानसभेला थेट अजितदादा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढताना दिसतील… अशा वेळेस दादांच्या विरोधात शरद पवार गटाकडून निवडणुकीत उतरण्याची हिम्मत कोण दाखवू शकेल? पवारांच्याच घरातील कोणता चेहरा आमदारकीला दादांना नडू शकतो? अजितदादांना आव्हान देणारा पवार कुटुंबातलं नवं दादा नेतृत्व कोणतं आहे? तेच पाहुयात
लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) असा ननंद भावजयी यांच्यातला सामना पार पडला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पडलेल्या पवार विरुद्ध पवार या निवडणुकीकडे त्यामुळे पुऱ्या देशाचं लक्ष होतं… बारामती लोकसभेची जागा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट ठरली होती… तिसऱ्या टप्प्यात इथलं मतदान आटोपलं… बारामतीतून घड्याळाची टिकटिक चालू राहील की तुतारी वाजेल, हे आजही आपण ठामपणे सांगू शकत नाही…पण अजितदादा किंवा शरद पवार यांच्यापैकी जो कुणी निवडणुकीत पराभूत होईल. त्याला बारामतीवर क्लेम करण्याचा आणखीन एक चान्स मिळतो. तो म्हणजे बारामती विधानसभा…
1991 पासून सलग सात टर्म बारामती विधानसभेवर अजितदादांचा एकहाती होल्ड आहे. शरद पवारांनी किंवा पवार कुटुंबातील कुठल्याही दुसऱ्या सदस्यानं अजितदादांच्या विधानसभा क्षेत्रात कधीच हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला कारण म्हणजे दादांचं आक्रमक राजकारण… शरद पवारही मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून बारामतीचा स्थानिक पातळीवरचा कंट्रोल अजितदादांच्या हातात देऊन बसलेत… अजितदादा बारामतीचा बॅक हँड सांभाळायचे.. तर शरद पवार दिल्लीतून पक्षाचं राजकारण पुढे घेऊन जायचे.. राजकारणाची ही लाईन राष्ट्रवादीला पुढे घेऊन जाणारी होती… पण अजितदादांनीच राष्ट्रवादी फोडल्यानं शरद पवारांचा बारामतीचा बेस नाहीसा झाला… अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील अजितदादांच्या विश्वासातले झाले… याची चुणूक लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामती विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळालीच…त्यामुळे अजितदादांच्या बारामतीतल्या मुरलेल्या राजकारणाला विधानसभेला शरद पवार गटाकडून नक्की कोण टक्कर देईल, असा प्रश्न समोर येतो. तेव्हा पवार कुटुंबातीलच काही सदस्यांची नाव आपसूक पुढे येतात…
त्यातलं पहिलं नाव म्हणजे श्रीनिवास पवार
श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) हे अजितदादांचे धाकटे बंधू. अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिलेल्या श्रीनिवास पवार यांना मात्र राष्ट्रवादी फुटीचा अजितदादांचा निर्णय काही पटला नाही… त्यात लोकसभेला घरातलाच उमेदवार देऊन पवार विरुद्ध पवार अशा संघर्षाची ठिणगी पाडल्यामुळे श्रीनिवास पवार हे शरद पवार गटात ऍक्टिव्ह झाले. त्यांच्या पत्नी, चिरंजीव असा सगळाच परिवार हा दादाच्या विरोधात एकवटला… याच श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना मिशी काढण्याचंही आव्हान दिलं. यावरून या दोन भावांच्यातील अंतर किती वाढलंय? याची आपल्याला कल्पना येऊ शकते. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे… श्रीनिवास पवार यांचा तालुक्यातील कनेक्ट कमी असला तरी त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांच्या शरयू फाउंडेशनच्या निमित्ताने त्यांना आपला बेस स्ट्रॉंग करता येईल… त्यात घरातलाच उमेदवार दिल्याने पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सहानुभूतीची मतं आपल्या बाजूला वळती करून घेता येतील…पण आपण भलं आणि आपला उद्योग भला… असं बोलणाऱ्या श्रीनिवास पवार हे राजकारणाला यापुढे सिरियसली घेतील का? हा कळीचा मुद्दा आहे…
दुसरं नाव येतं ते राजेंद्र पवार यांचं…
शरद पवारांचे बंधू आप्पासाहेब पवार यांचे राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांचे सुपुत्र. बारामतीतील केवीके आणि यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्या नावाचा पंचक्रोशी दबदबा आहे… आपला मुलगा रोहित पवार राजकारणात असला तरी राजेंद्र पवारांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नव्हता. पण राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीत तयार झालेली स्पेस भरून काढायची असेल तर शरद पवार गटाकडून राजेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा होऊ शकते… शरद पवार गटासोबत मुलगा रोहित पवार आपल्या वडिलांसाठी इथं मोठी फिल्डिंग लावू शकतो… असं झाल्यास बारामतीच्या आमदारकीची अजित पवार विरुद्ध राजेंद्र पवार ही लढत चांगलीच घासून होऊ शकते.
तिसरं नाव येतं ते युगेंद्र पवार यांचं…
राष्ट्रवादीतील फुटीनंतर युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे नाव पुढे आलं. लोकसभेला युगेंद्र पवार यांनी पायाला भिंगरी बांधून सुप्रियाताईंचा प्रचार केला…सुप्रिया ताईंची कन्या रेवती सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या आक्रमक प्रचाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही वायरल झाले. तसं बघायला गेलं तर युगेंद्र पवार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेले नाहीये… शरद पवारांनी हीच मेख ओळखून त्यांना याआधी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपदी दिलं होतं. पण युगेंद्र पवार यांचा साखर कारखाना हा फलटण तालुक्यात येतो… तिथून राजकारण करायचं असेल तर त्याला बऱ्याच मर्यादा आहेत… फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्यांच्याकडे पर्याय उरतो तो केवळ बारामतीचा…अशावेळेस शरद पवार गटाने ताकद लावली तर बारामती विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी अनोखी लढत आमदारकीला बघायला मिळू शकते… लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी युगेंद्र पवार यांच्यावर बरीच पर्सनल टीका केली होती… कुस्ती येत नाही, कुस्तीचे डाव माहीत नाहीत.. आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झालेत.. असा टोमणा अजितदादांनी भर सभेतून मारला होता… यालाच उत्तर म्हणून युगेंद्र पवार बारामती विधानसभेच्या आखाड्यात अजितदादांशी दोन हात करायला तयार झाले, तर नक्कीच आश्चर्य वाटणार नाही…
आता या यादीतलं सर्वात शेवटचं नाव येतं ते रोहित पवार यांचं…
रोहित पवार (Rohit Pawar) यांचा मतदारसंघ तसा कर्जत जामखेड. तिथं त्यांनी पाच वर्षात आपलं बरंच राजकारण पेरलं. पहिल्याच टर्ममध्ये रोहित पवार हे नाव राष्ट्रवादीतील युवा नेतृत्व म्हणून फ्रंटला आलं. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या घटनांवर रोहित पवारांच्या कमेंट घेतल्या जाऊ लागल्या…इतकंच काय तर अधिवेशनाच्या काळात रोहित पवार हे आपल्या हटक्या राजकारणामुळे नेहमीच चर्चेत असायचे… रोहित पवार राजकारणात आल्यापासूनच शरद पवारांचा वारसदार म्हणून त्यांच्या नावाची बरीच चर्चा झाली… पण ती चर्चा कृतीतून त्यांना काही पुढे घेऊन जाता आली नाही…पण हाच चान्स आता बारामती विधानसभेच्या निमित्ताने त्यांच्यासाठी चालून आली आहे… पहिली गोष्ट म्हणजे रोहित पवार आत्ता च्या मतदारसंघातून आमदार आहेत तिथलं राजकीय समीकरण पुरतं बदलून गेलय. लंके विरुद्ध विखे अशा लढतीमुळे विखें सोबतचे रोहित पवारांचे संबंध बिघडलेले आहेत.. त्यात राम शिंदे आणि भाजपने या मतदारसंघासाठी आपली ताकद दोन-तीन वर्षांपासूनच वाढवायला सुरुवात केलीय… त्यात अजितदादांची स्वतंत्र यंत्रणाही कर्जत जामखेडमध्ये काम करताना दिसते… त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर रोहित पवारांसाठी कर्जत जामखेडची जागा या टर्मला प्रतिकूल आहे… अशावेळी त्यांच्यासाठीही पर्याय उरतो तो अर्थातच बारामतीचा… ‘शरद पवारांचा वारसदार’ हे जे काही राजकारणातलं नरेटीव सेट करण्याची धडपड रोहित दादा करतायत. ती गोष्ट अजित पवार विरुद्ध रोहित पवार या लढतीमुळे आणखीन स्पष्ट होईल…
सक्रिय राजकारणातील चेहरा असल्यामुळे रोहित पवारांसाठी ही टक्कर देणं फारसं अवघड नसेल…पण या सगळ्यात अजितदादांचं आक्रमक राजकारण, मतदारसंघावरचा होल्ड, कार्यकर्त्यांचा कनेक्ट, टप्प्यात कार्यक्रम करण्याची पद्धत आणि 35 वर्षांपासूनचा मतदारसंघातल्या राजकारणाचा अनुभव या सगळ्यामुळे विरोधी उमेदवाराला बारा हत्तींचे बळ अंगात घेऊन बारामतीत लढत द्यावी लागणार, एवढं मात्र नक्की…या सगळ्यातून एक स्पष्ट होतं की अजितदादांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी पवार कुटुंबात अनेक दादा लोक आहेत. पण फक्त अजितदादांच्या राजकारणापुढे त्यांचा निभाव लागू शकतो का? हाच तेवढा प्रश्न आहे…