औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे. मात्र तरी रस्त्यावरची गर्दी मात्र कमी झालेली नाही. दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांतून नागरिक शहरात सर्रास फिरत असल्याचे मंगळवारी दिसून आले. या गर्दीला नियंत्रित करण्याचे आव्हान मात्र आता प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रोजची कोरोनाचे हजारो रूग्ण आढळत असल्याने सरकार चिंतेत पडले आहे.
त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहीम गतीने राबवली जात आहे. तरीही कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांवर गेली आहे. त्यातच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले. या निर्बंधाच्या अमंलबजावणीला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने यापूर्वी काढलेल्या आदेशात दुकाने, धार्मिकस्थळे सुरू राहतील असे म्हटले होते. त्यानंतर सोमवारी रात्री उशिराने जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्हयात नव्याने निर्बंध लागू करण्याचे आदेश काढले. या आदेशामुळे व्यापारी, दुकानदार व नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे.
मंगळवारी सकाळी दुकाने उघडण्यासाठी कर्मचारी व दुकान मालक दुकानांसमोर येऊन थांबले मात्र दुकाने बंद ठेवावेत, असे आवाहन पोलीसांकडून केले जात असल्याचे पाहून दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. यामध्ये कपडे, सोनार, खेळणी, प्लास्टिक वस्तू विक्रेते, फर्निचर, पुस्तके, मोटार-सायकल विक्रीचे दुकाने व शो रुम, चार चाकी विक्रीचे शो रुम, भांडी बाजार, इतर वस्तूची होलसेल व किरकोळ विक्रीच्या दुकानांचा समावेश आहे.
बाजारपेठा बंद,नागरिक रस्त्यांवर…
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केल्यामुळे मंगळवारी शहरात बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्यात आले. मात्र नागरिकांची रस्त्यावर गर्दी दिसून आली. दुचाकी, चार चाकी वाहनातून सर्रासपणे नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे पहायला मिळाले. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या फिरण्यावर बंधने घातल्यास कोरोना नियंत्रणात आणण्यात मदत होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.