Achalpur Crime : अचलपुरात ‘त्या’ रात्री हिंदू मुस्लिम वाद का चिघळला? भाजप असो वा काँग्रेस दोघंही एकाच माळेचे मणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनंत चतुर्थीच्या दिवशी अचलपूर शहरातील सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांधीपुल भागात शुल्लक कारणावरून तणाव (Achalpur Crime) निर्माण झाला आणि दोनशेच्या जवळपास जमावाने पोलीस व गणपती मंडळावर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी व काही गणपती मंडळाचे सदस्य जखमी झाल्याचे पाहायला मिळालं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या घटनने गणेशोत्सवाला गालबोट लागलं. ऐन सणासुदीच्या काळात अशा प्रकारे दगडफेकीचे वातावरण का आणि कशासाठी निर्माण करण्यात आले? यामागे कोणतं राजकीय षडयंत्र होते का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असतानाच सोशल मीडियावर एक व्हायरल मेसेज फिरत आहे. अचलपूरचा एक हिंदू तरुण नावाने फिरणाऱ्या या मेसेजच्या माध्यमातून अचलपुरात ‘त्या’ रात्री हिंदू -मुस्लिम वाद (Hindu Muslim Dispute) का चिघळला? याचे कारण आणि त्यामागील राजकीय स्वार्थ सांगण्यात आला आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात…

काय आहे व्हायरल मेसेज-

नमस्कार, २-४ दिवसांपूर्वी आपल्या अचलपूर मध्ये रात्रीच्या अंधारात हिंदू मुस्लिम वादाची जी घटना घडली याबद्दल मला तुमच्याशी जरा सविस्तर बोलायचं आहे. एक नागरिक म्हणून मी या गोष्टींना वैतागून गेलो आहे. मी ना भाजपवाला आहे ना काँग्रेसवाला आहे. पण संत गाडगे महाराज यांच्या भूमीत जन्माला आलेला आणि अचलपूरचा रहिवासी असल्याचा गर्व असलेला एक हिंदू आणि राष्ट्रभक्त नक्की आहे. मात्र रात्रीच्या त्या घटनेनंतर मला एक अचलपूरकर म्हणून जे काही वाटतंय ते इथे लिहितो आहे. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. दुटप्पी राजकारण्यांनी तुम्हाला लावलेल्या पट्टीमुळे तुम्ही मला ऐकून तरी घेणार आहेत का मला माहिती नाही. पण तरी चार शब्द बोलण्याचे धाडस करतोय..

निवडणूका तोंडावर आल्या की अचानक हिंदू मुस्लिम वाद कसा उफाळून येतो?

अगदी एखाद्या शुल्लक कारणावरून माणसामाणसात वणवा पेटवून कोण आपली पोळी भाजून घेतो? घटनेनंतर लगेच एका विशिष्ट पक्षाचे लोक तिथं कसे जमा होतात? भाजप हिंदू खतरे मे है म्हणत वातावरण तापवतं तर दुसरीकडे काँग्रेसवाले संविधान खतरे मे है असं म्हणत दलित, मुस्लिम व्होट बँक खिशात भरायचा प्रयत्न करतात. आम्ही मात्र वेड्यासारखे या राजकारण्यांच्या जाळ्यात अडकतो, अन पुन्हा पाच वर्ष विकासाच्या नावाने बोंबा मारत बसतो. आता मात्र असं नीच राजकारण करणाऱ्यांच्या विष कालावण्याच्या प्रवृतींना आम्ही बळी पडणार नाही.

🤔सर्वात अगोदर अचलपुरात त्या रात्री नक्की काय घडलं ते समजून घेऊयात…

अचलपुरात सगळीकडे उत्साहात गणेशविसर्जन मिरवणूक वाजत गाजत सुरु होत्या. गांधी पुलावरही अर्ध्या भागापर्यंत गणेशमंडळाचं लाइटिंग तर अर्ध्या भागात उरूसचं डेकोरेशन होतं. डेकोरेशन पाहायला आलेली २-३ लहान मुल एकमेकाला चेष्ठा मस्करीत दगड मारत होती. त्यांचा एक दगड उरूसच्या कमानीला लागला अन डेकोरेशचं पोस्टर खाली पडलं. अगदी शुल्लक असलेल्या या गोष्टीवरून काही मिनिटांतच दोन्ही बाजूचा मोठा समूह जमा झाला अन लहानश्या गोष्टीचा इशू करून छोटा वाद विकोपाला जाऊन मोठी ठिणगी पडली. शेवटी पोलिसांना कर्फ्यू लावावा लागला अन जमाव पांगला.

😰हिंदू मुस्लिम दंगलीतून भाजपचा अन काँग्रेस या दोघांचा फायदा?

सकाळी मला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की दोन्ही बाजूची लोकं लगेच कशी काय जमा झाली? विकासाच्या मुद्द्यावर जर अशा वेगाने एकत्र येता आलं तर अचलपूरचे अमेरिका व्हायलाही वेळ लागायचा नाही. पण त्याचवेळी मनात विचार आला हे सगळं ठरवून तर केलं जात नाहीये ना? कारण नेहमी निवडणुका तोंडावर आल्या की हिंदू मुस्लिम दंगली घडवून घाणेरडं राजकारण करायची सवय अनेक महाभागांना आहे. लोकांची कामे करून त्यांची मने जिंकता येत नसतील तर त्यांच्यात भांडण लावून, विष कालवून मत कशी पाडून घ्यायची याची कला या देशातल्या भाजप अन काँग्रेस या दोन्ही लोकांकडे चांगलीच आहे.

😱शांत डोक्याने विचार केल्यावरच पडद्यामागचा खरा गेम लक्षात येतो

सध्या राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. महाराष्ट्रातील सद्य स्थिती बारकाईने पाहिली तर भाजपला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जायला लागू शकते असं चित्र आहे. विकासाच्या कामावर मत मागायला आता जागा उरलेली नसल्याने हिंदुत्वावर निवडणूक लढवून गोरगरीब जनतेला पुन्हा हिंदुत्वावरून पेटवून देऊन निवडणुकीत बाजी मारण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे मुस्लिम व्होटबँक कशी आपल्याच खिशात पडेल असा कट काँग्रेस कडून आखला जातोय. हिंदू मुस्लिम वाद हा भाजप आणि काँग्रेस अशा दोघांच्याही फायद्याचा आहे. कारण यामुळे दोघांची मत वाढतात आणि यातूनच त्यांचा सत्तेचा मार्ग मोकळा होतो. इंग्रजांनी जे केले तेच आता हे पण तेच करतायत असं आपण म्हणायला हरकत नाही. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांचीच घाणेरडी नीती सद्याचे हे राजकारणी वापरतायत. पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण यांच्या या कारस्थानांना बळी न पडता त्यांचा डाव हाणून पडला पाहिजे.

मी पण एक तरुण आहे. माझेही रक्त सळसळतं आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून मला एकच सांगायचंय की एखाद्याला भिडायला मागे पुढे न पाहणारा मर्द असलो तरी येऱ्या गैऱ्याच्या कुटील राजकारणाचा मी बळी होणार नाही. मला भाजप आणि काँग्रेस अशा दोघांनाही इतकाच सांगायचंय की राजकारण करायचंच असेल तर गरीबाची गरिबी दूर करण्यासाठी करा, दीनदुबळ्याला दवाखान्याची मदत करण्यासाठी करा, व्यवस्थेच्या आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध राजकारण करा. माझ्या शेतकरी बापाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला बाजारभाव मिळवण्यासाठी खुशाल राजकारण करा. पण तुम्ही आजवर आमच्यासाठी काहीच करू शकलेला नाही हे लपवण्यासाठी आमच्यात भांडणे लावून मूळ मुद्द्यावरचे आमचे लक्ष विचलित करण्याचे कारस्थान करू नका.

धन्यवाद.

-अचलपूरचा एक हिंदू तरुण